Tharal Tar Mag New Update : ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘ठरलं तर मग’ सध्या प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत असल्याचं पाहायला मिळत आहे. ही मालिका केवळ कथानकामुळेच नव्हे, तर सातत्याने मिळणाऱ्या दमदार टीआरपीमुळेही चर्चेत असते. टीआरपीच्या शर्यतीत ही मालिका नेहमीच अव्वल स्थानावर राहिल्याचं दिसून येत आहे. मालिकेतील अर्जुन आणि सायली यांच्या जोडीला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळत आहे. या दोघांची ऑनस्क्रीन केमिस्ट्रीने प्रेक्षकांच मन जिंकलं आहे. मालिकेत येणारे सततचे ट्विस्ट आणि टर्न्स प्रेक्षकांना खिळवून ठेवत आहेत.
दरम्यान, मालिकेत सायलीची भूमिका साकारणारी अभिनेत्री जुई गडकरी सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. ती तिच्या चाहत्यांशी थेट संवाद साधत असून तिच्या खासगी आयुष्याबाबत तसेच कामासंदर्भातील अपडेट्स शेअर करताना दिसते. चाहत्यांच्या मनात येणाऱ्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी ती ‘आस्क मी सेशन’च्या माध्यमातून नेहमीच संवाद साधते.

सध्या मालिकेत एक मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार असून, अनेक वर्षांपूर्वीचं दडलेलं सत्य उलगडणार असल्याचं समजत आहे. याशिवाय, मालिकेत एक मोठा खुलासाही होणार आहे. दरम्यान, स्टार प्रवाह वाहिनीवर येत्या काळात नव्या मालिकांची घोषणा करण्यात आल्याने “‘ठरलं तर मग’ ही मालिका संपणार का?” किंवा “अंतिम टप्प्यात आली आहे का?” असे अनेक प्रश्न चाहत्यांच्या मनात निर्माण झाले होते.
आणखी वाचा – रितेश देशमुखची धमाकेदार एंट्री,’बिग बॉस’ मराठीच्या नव्या प्रोमोने वाढवली उत्सुकता; सूत्रसंचालन करणार आणि…
याबद्दल अभिनेत्री जुई गडकरीला नुकत्याच झालेल्या ‘आस्क मी सेशन’मध्ये या संदर्भात प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना जुई म्हणाली, “अजिबात नाही! अशा बातम्यांवर विश्वास ठेवू नका. ‘ठरलं तर मग’ मालिका संपण्याच्या मार्गावर नाही. उलट, प्रेक्षकांसाठी आणखी नवनवीन आणि रंजक भाग घेऊन येण्यासाठी आम्ही तयारीत आहोत. तुम्ही दिलेल्या भरभरुन प्रेमासाठी मनापासून धन्यवाद. टीआरपीच्या वाढत्या आकडेवारीतून तुमचं प्रेम आम्हाला स्पष्टपणे दिसत आहे” या शब्दांत जुई गडकरीने चाहत्यांच्या सर्व शंका दूर करत ‘ठरलं तर मग’ ही मालिका संपत नसल्याचं स्पष्ट केलं आहे.


