Janhavi Killekar Angry On Ruchita : ‘बिग बॉस’ मराठीच्या सहाव्या सिझनमधून बाहेर पडलेली रुचिता जामदार सध्या चांगलीच चर्चेत आहे. घरात असतानाच तिचे अनेक स्पर्धकांसोबत वाद झाले होते. एलिमिनेशननंतर बाहेर आल्यानंतरही रुचिता सातत्याने मुलाखती देताना दिसत आहे. या मुलाखतींमध्ये तिने शोबद्दल तसेच घरातील काही स्पर्धकांबद्दल केलेल्या वक्तव्यांमुळे सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगली आहे. रुचिताने ‘बिग बॉस’च्या घरातील काही गोष्टींबद्दल खुलेपणाने बोलत अनेक स्पर्धकांची पोलखोल केल्याचंही पाहायला मिळालं. त्यामुळे काही जण तिच्या वक्तव्यांवर टीका करताना दिसत आहेत.
दरम्यान, ‘बिग बॉस’ मराठी सिझन पाचमध्ये फिनालेपर्यंत पोहोचलेली अभिनेत्री जान्हवी किल्लेकर हिने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत रुचिता जामदारवर थेट टीका केली आहे. त्या व्हिडीओमध्ये जान्हवी म्हणाली की, “महाराष्ट्रात अनेक कलाकार, कंटेंट क्रिएटर्स आणि इन्फ्लुएन्सर्स आहेत ज्यांना ‘बिग बॉस’च्या घरात जाण्याचं स्वप्न असतं. अनेक जण या शोमध्ये संधी मिळावी म्हणून प्रयत्न करत असतात”. तिच्या मते, ‘बिग बॉस’ हा खूप मोठा आणि प्रतिष्ठेचा शो आहे आणि त्या घरात जाण्याची संधी प्रत्येकालाच मिळत नाही.”
ती पुढे म्हणाली की, “जेव्हा अशी मोठी संधी मिळते तेव्हा तिचं महत्त्व समजून घ्यायला हवं. काही स्पर्धक घरात जाऊन चांगला खेळ दाखवण्याऐवजी बाहेर आल्यावर त्या शोबद्दलच वाईट बोलतात, हे योग्य नाही. ज्या प्लॅटफॉर्ममुळे आपल्याला ओळख मिळते, त्याच्याबद्दल आदर ठेवायला हवा”, असंही तिने स्पष्ट केलं. जान्हवीने रितेश देशमुख यांच्याबद्दल बोलताना सांगितलं की, “त्यांच्या बाबतीत कुणीही चुकीचं बोलू नये”. तिच्या मते, “रितेश देशमुख हे अत्यंत चांगले व्यक्ती आहेत आणि शोला त्यांनी एक वेगळी ओळख दिली आहे”. रुचिता जामदारने ‘बिग बॉस’विरोधात केलेल्या वक्तव्यांवर प्रतिक्रिया देताना जान्हवीने असंही म्हटलं की, “प्रत्येक स्पर्धकाकडून चुका होऊ शकतात आणि गेममध्ये अनेकदा परिस्थिती बदलत असते. मात्र याचा अर्थ असा नाही की बाहेर येऊन त्या शोबद्दलच नकारात्मक बोलावं”. सध्या जान्हवी किल्लेकरच्या या वक्तव्यामुळे सोशल मीडियावर नव्या चर्चेला सुरुवात झाली आहे.





