Vivian Dsena First Reaction : ‘बिग बॉस १८’ हा रिऍलिटी शो बरेच दिवसांपासून चर्चेत होता. यंदाच्या पर्वातील सर्वच स्पर्धकांची विशेष चर्चा रंगलेली पाहायला मिळाली. यंदाच्या या पर्वाचा नुकताच महाअंतिम सोहळा पार पडला. या पर्वात अभिनेता व स्पर्धक करणवीर मेहराने बाजी मारत ट्रॉफीवर आपले नाव कोरले. तर उपविजेतेपद विवियन डिसेनाने पटकावले. विवियन डिसेनाला हरवून करणवीर मेहराने हा शो जिंकला हे अनेकांना आवडलेलं नाही. याचे प्रतिसाद सोशल मीडियावर उमटताना दिसत आहेत. ‘बिग बॉस’ची ट्रॉफी न जिंकू शकल्याबद्दल विवियनने केलेलं भाष्य सध्या चर्चेत आलं आहे. विवियनने यावेळी बोलताना प्रेक्षकांचे आभार मानले आहेत. याशिवाय त्याने करणवीर मेहरा जिंकला त्याबद्दलही आपले मत मांडले आहे.
उपविजेतेपद पटकावल्यानंतर विवियनने असं म्हटलं की, “मी नशिबावर विश्वास ठेवणारा आहे. करिअरबाबत तक्रार असलेला मी कदाचित शेवटचा माणूस असेल. आयुष्यात जे काही घडतं ते चांगल्यासाठी घडतं. ते आपल्याला आता समजत नाही, पण नंतर समजतं. त्यामुळे याकडे सकारात्मक दृष्टीकोनातून बघायला पाहिजे. लोकांनी खूप प्रेम दिलंय, कुटुंबियांनी खूप प्रेम दिलंय. इंडस्ट्रीतील अनेकांनी पाठिंबा दिला, त्यापैकी काही जणांना तर कदाचित मी भेटलोही नसेन. इतका पाठिंबा जनतेकडून मिळाला”.
आणखी वाचा – Chhaava Movie : विकी कौशलचे ‘छावा’मधील रौद्र रुप समोर, लूकने वेधलं लक्ष, प्रेक्षकांना ट्रेलरची प्रतिक्षा
तर करणवीरबद्दल बोलताना विवियन म्हणाला, “माझा नशिबावर विश्वास आहे. माझ्या नशिबात ट्रॉफी नव्हती, त्याच्या नशिबात होती, तर त्याला मिळाली. माझ्या नशिबात लोकांचं प्रेम लिहिलं होतं, तर ते मला मिळालं”. १५ आठवड्यांच्या प्रवासानंतर करणवीर मेहराने ‘बिग बॉस १८’ची ट्रॉफी पटकावली. अनेक वाद, मतभेद, सामंजसपणा सांभाळत त्याने बाजू सांभाळली. असं असलं तरी अगदी पहिल्या दिवसापासून प्रेक्षकांना विवियनने ही ट्रॉफी जिंकावी असं वाटत होतं.
सोशल मीडियावर तर या शोला स्क्रिप्टेड असं संबोधत ट्रोलही केलं जात आहे. करणवीर विजेता झाल्याचे अनेकांना पटलं नसून त्यांनी ‘बिग बॉस’ला फेक म्हटलं आहे. करणवीर मेहरा, चुम दरांग, रजत दलाल, विवियन डिसेना, अविनाश मिश्रा व ईशा सिंह हे बिग बॉस १८ चे टॉप सहा सदस्य होते.