गेल्या अनेक महिन्यांपासून छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यावर भव्य चित्रपटाची निर्मिती केली जात असल्याची चर्चा सुरु आहे आणि हा चित्रपट म्हणजे ‘छावा’. निर्मात्यांनी या चित्रपटाबाबतच्या अनेक गोष्टी गुलदस्त्यात ठेवल्या आहेत. विकी कौशलची प्रमुख भूमिका असलेला आणि लक्ष्मण उतेकर या मराठमोळ्या दिग्दर्शकाच्या ‘छावा’ या चित्रपटाची प्रेक्षकांना उत्सुकता लागून राहिली आहे. ‘छावा’ हा चित्रपट येत्या ६ डिसेंबरला प्रदर्शित होणार होता. परंतु ‘पुष्पा-२’ मुळे ‘छावा’च्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली. तेव्हापासून ‘छावा’ नेमका कधी रिलीज होणार? याविषयी अनेक चर्चा सुरु होत्या. अशातच आता या चित्रपटाचे पहिले मोशन पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीस आलं आहे. (Vicky Kaushal Chhaava Motion Poster)
अभिनेता विकी कौशलने छावा चित्रपटातील आणखी काही नवीन लूक समोर आणले आहेत. ज्यामुळे चित्रपटाची उत्सुकता आणखीनच वाढली आहे विकीने शेयर केलेल्या मोशन पोस्टरमध्ये पहिल्या लूकमध्ये, तो त्याच्या हातात तलवारी घेऊन भोवती आग आहे आणि तो रागात दिसतो, जो योद्धाचे धैर्य दर्शवितो. यानंतर रणांगणात बेधडकपणा दाखवणाऱ्या विकी कौशलची आणखी एक झलक पाहायला मिळत आहे. एका हातात तलवार आणि दुसऱ्या हातात ढाल घेऊन तो चिलखत घातलेला दिसत आहे.
आणखी वाचा – Video : Coldplay मध्ये नवरा व वडिलांसह श्रेया घोषालचा धमाल डान्स, गाणं ऐकूनच डोळ्यांत पाणी, व्हिडीओ व्हायरल
या मोशन पोस्टरमधील तिसऱ्या फोटोमध्ये त्याच्यामागे पाणी दिसत आहे आणि त्याने भगवे कपडे घातले आहेत. तसंच हातात धनुष्यबाण घेऊन निशाणा साधतानाचे दिसत आहे. यानंतर, अभिनेत्याचे आणखी एका लूकमध्ये त्याने एका हातात त्रिशूळ आणि दुसऱ्या हातात दोरी धरली आहे आणि तो जंगलात जात असल्याचे दिसत आहे. एकूणच हे सर्व लूक्स प्रेक्षकांच्या पसंतीस पडले आहेत. तशा अनेक प्रतिक्रियाही चाहत्यांनी व्यक्त केल्या आहेत.
दरम्यान, ‘छावा’ हा चित्रपट येत्या १४ फेब्रुवारी २०२५ रोजी प्रदर्शित होणार आहे. १४ फेब्रुवारी हा दिवस निवडण्यामागे निर्मात्यांनी खास शक्कल लढवली आहे. ती म्हणजे ‘छावा’ चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर काहीच दिवसांनी म्हणजेच १९ फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे. या खास दिनाचं औचित्य साधून निर्मात्यांनी ‘छावा’ हा बहुचर्चित व बहूप्रतिक्षित चित्रपट १४ फेब्रुवारीला प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला आहे.