‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मधील मिस्टर सोढी म्हणून लोकप्रिय झालेले अभिनेते गुरुचरण सिंग यांच्या बेपत्ता होण्याच्या वृत्ताने सर्वांनाच त्यांच्याविषयी चिंता वाटत आहे. गेल्या चार दिवसांपासून अभिनेत्याचा काहीच शोध लागलेला नाही तसेच त्यांचा काही संपर्कही झालेला नाही. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजमध्ये गुरचरण सिंहला पाहिले, परंतु तो मुंबईला जाणाऱ्या विमानामध्ये चढलाच नाही. त्यमुळे गुरुचरण सिंह नेमके कुठे गेले हे कोणालाच समजत नाही. मात्र, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी अभिनेत्याच्या अपहरणाचा गुन्हा दाखल केला असून वडिलांनी हरवल्याची तक्रारही दाखल केली आहे.
मात्र तुम्हाला माहीत आहे का?, गुरुचरण सिंह सारखीच एक घटना २०१५ सालीही एका अभिनेत्याबरोबर घडली होती, ज्याचाही अद्याप काहीही शोध लागलेला नाही आणि हा अभिनेता म्हणजे विशाल ठक्कर होता. विशालने ‘मुन्ना भाई एमबीबीएस’ आणि ‘टँगो चार्ली’ सारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. योगायोगाने विशाल ठक्करही ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’चा एक भाग होता. यामध्ये तो गोकुळधाम सोसायटीच्या नृत्य शिकवणाऱ्या शिक्षकाच्या भूमिकेत दिसला होता.

‘नवभारत’च्या वृत्तानुसार, ९ वर्षांपूर्वी एका रात्री विशाल घरातून बाहेर पडला होता आणि आता ९ वर्षे झाली, पण विशालबाबत काहीच माहिती मिळालेली नाही. आपला मुलगा या जगात आहे की नाही, हेही घरच्यांना कळत नाही. अखेर विशालचं काय झालं? त्या रात्री तो अचानक कुठे गायब झाला? ३१ डिसेंबर २०१५च्या रात्री जेव्हा विशालने त्याच्या आईला चित्रपटगृहात येऊन चित्रपट बघायला सांगितले होते. पण आईने नकार दिला. त्याची आई त्याच्याबरोबर न गेल्याने त्या दिवशी रात्री साडेदहाच्या सुमारास विशालने आईकडून ५०० रुपये घेतले आणि चित्रपट पाहण्यासाठी एकटाच घराबाहेर पडला. त्याच रात्री १च्या सुमारास विशालने वडिलांना मेसेज केला की, तो पार्टीला जात आहे. चित्रपट पाहून विशाल पार्टीला गेला असावा, या विचारात कुटुंबीय होते. मात्र दुसऱ्या दिवशी विशाल घरी परतलाच नाही.

२०१९ मध्ये विशालची आई दुर्गा यांनी ‘इंडियन एक्स्प्रेस’बरोबर तिचे दु:ख शेअर केले होते. त्यावेळी पोलिसांनी सांगितले होते की, विशालला त्याच्या मैत्रिणीने १ जानेवारी २०१६ रोजी रात्री ११.४५ वाजता शेवटचे पाहिले होते. त्यानंतर तो रिक्षातून अंधेरी येथे शूटिंगला जात होता. त्यानंतर विशालचा फोन बंद येऊ लागला. ना कोणी खंडणीसाठी फोन केला, ना कोणत्या हॉस्पिटल, रेल्वे स्टेशन किंवा इतर कोठेही अभिनेत्याची नोंद किंवा माहिती सापडली नाही. विशालच्या बँक खात्यातही कोणत्या प्रकारचा व्यवहार झालेला दिसला नाही.
नंतर, विशाल ठक्करचे प्रकरण कासारवडवली पोलिसांकडे वर्ग करण्यात आले कारण अभिनेत्याच्या फोनचे शेवटचे लोकेशन घोडबंदर रोड होते. मात्र विशाल ठक्करचे प्रकरण खून, अपहरणाचे आहे की तो कुठेतरी फरार झाला आहे, हे समजू शकले नाही. तसे, आम्ही तुम्हाला सांगतो की त्याच वर्षी त्याच्या बेपत्ता होण्याच्या काही महिन्यांपूर्वी, एक टीव्ही अभिनेत्री आणि विशाल ठक्करच्या कथित मैत्रिणीने अभिनेत्यावर बलात्काराचा आरोप केला होता. मात्र, नंतर दोघांनी आपापसात हे प्रकरण सोडवले. त्यांनी आपली तक्रारही मागे घेतली होती. मात्र काही महिन्यांपूर्वी ती तिच्या कांदिवलीतील फ्लॅटमध्ये मृतावस्थेत आढळून आली होती.