छोट्या पडद्यावरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या विनोदी कार्यक्रमातून घराघरांत लोकप्रिय झालेल्या अभिनेत्री म्हणजे विशाखा सुभेदार. या कार्यक्रमाआधी विशाखा यांनी अनेक मालिका, चित्रपट व विनोदी कार्यक्रमांतून आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे. मात्र, महाराष्ट्राची हास्यजत्रा या विनोदी कार्यक्रमामुळे त्यांना आणखीनच लोकप्रियता मिळाली. आपल्या अभिनयाने चर्चेत राहणारी ही अभिनेत्री सोशल मीडियावरही तितकीच सक्रिय असते. नुकताच त्यांना सचिन मोटे व सचिन गोस्वामी यांच्या हस्ते ‘राम नगरकर पुरस्कार सोहळा २०२४’मध्ये गौरविण्यात आलं.
या गौरवानिमित्त काही फोटो शेअर करत त्यांनी एक खास पोस्ट लिहिली असून या पोस्टने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं होतं. या पोस्टद्वारे त्यांनी “मी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’तुन बाहेर पडले याचा अर्थ असा नाही होत की, मी विनोदी अभिनय करण सोडलं. फक्त एक ब्रेक घेतला होता. मात्र पुन्हा एखाद्या विनोदी भूमिकेत दिसेनच” असं म्हटलं होतं. याबद्दल विशाखा यांनी पुन्हा एकदा त्यांची भूमिका मांडली आहे, नुकतंच ‘इट्स मज्जा’बरोबर साधलेल्या संवादात त्यांनी याविषयी भाष्य केले.
‘इट्स मज्जा’बरोबर साधलेल्या संवादात विशाखा यांनी असं म्हटलं की, “तो (महाराष्ट्राची हास्यजत्रा) शो सोडल्यानंतर विनोदी कार्यक्रम किंवा विनोदी भूमिका करणार नाही का? असं अनेकदा विचारण्यात आले आहे. पण मी त्यांना म्हटलं की असं काही नाही. कधीतरी विनोदी कार्यक्रमात किंवा विनोदी भूमिका नक्कीच करेन. आता मी खलनायिकेची भूमिका साकारत आहे, तसं पुढे जाऊन कधीतरी विनोदी भूमिकाही करेन.”
आणखी वाचा – सलमान खानच्या घरावर गोळीबार केलेल्या हल्लेखोरांचा चेहरा आला समोर, ‘या’ गॅंगशी आहेत संबंध, नेमका प्रकार काय?
यापुढे त्यांनी असं म्हटलं की, “मी त्या पोस्टमध्ये ‘लवकरच’ असं म्हटलं होतं कारण आपल्याला सवय असते ना असं म्हणायची. कारण आपण जितक्या लवकर म्हणतो तितक्या लवकर हे युनिव्हर्स ते ऐकतं आणि त्यामुळे ते काम घडतं म्हणून आपण लवकर म्हणायचं. बाकी काही नाही.”
दरम्यान, ‘फु बाई फु’, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’, ‘कॉमेडीची बुलेट ट्रेन’ अशा अनेक विनोदी कार्यक्रमातून विशाखा सुभेदार यांनी प्रेक्षकांचं भरपूर मनोरंजन केलं आहे. त्याचबरोबर त्यांनी अनेक चित्रपटांतदेखील काही भूमिका साकारल्या आहेत. याशिवाय आता त्या स्टार प्रवाहवरील ‘शुभविवाह’ मालिकेतील रागिणी या भूमिकेतून खलनायिकेची भूमिका साकारत आहेत.