तान्ह्या बाळाची काळजी घेणे, त्याचे संगोपन करणे हे प्रत्येक आईसाठी तारेवरची कसरत असते. प्रत्येक आई आपल्या बाळाची काळजी घेत त्याला हवी नको ती प्रत्येक गोष्ट पुरवण्यासाठी तिच्यापरीने सर्वतोपरी प्रयत्न करत असते. पण बाळाचे संगोपन करणे हे प्रत्येक आईसाठी एक वेगळा आनंदही असतो आणि प्रत्येक या प्रवासाचा आनंद घेत असते. असाच आनंद सध्या अभिनेत्री सई लोकुर घेत आहे.
‘बिग बॉस मराठी’ या रिअॅलिटी शोमधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणून सई लोकूरला ओळखले जाते. गेल्या काही दिवसांपासून सई ही तिच्या गरोदरपणामुळे चर्चेत आहे. सई लोकूर ही आई झाली आहे. सईने एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. गेल्या वर्षी १७ डिसेंबर रोजी सईला कन्यारत्न प्राप्त झाले. अभिनेत्री आई झाल्यानंतर तिच्यावर अनेकांनी शुभेच्छांचा वर्षाव केला. सई ही सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. सोशल मीडियावर ती तिचे व तिच्या बाळाबरोबचे अनेक फोटो, व्हिडीओ शेअर करत असते.
अशातच तिने नुकताच एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तिने तिच्या दिवसाची सुरुवात कशी होते, इथपासून ते तिच्या बाळाला सांभाळण्यामध्ये तिचा दिवस कसा जातो ते तिच्या दिवसाचा शेवट कसा होतो? याची झलक पाहायला मिळत आहे. यामध्ये ती सकाळी उठून ब्रश करताना, त्यानंतर चहा-नाश्ता करताना, जेवताना बाळाबरोबर खेळताना, बाळाला फिरायला घेऊन जाताना, बाळाची मालिश करताना, त्यानंतर दिवसाच्या शेवटी रात्री बाळाबरोबर झोपतानाचे खास क्षण तिने शेअर केले आहेत. या व्हिडीओला तिने ‘तुझमे ही तुझमे डुबा रहें’ हे गाणं लावलं आहे.
या व्हिडीओमध्ये तिने दिवसाची संपूर्ण झलक पाहायला मिळत असून या व्हिडीओखाली तिने असं म्हटलं आहे की, “माझा दिवस कसा दिसतो यावर एक झटपट नजर टाका. ‘ताशी’ (सईची मुलगी) आता ४ महिन्यांची होणार आहे आणि तिची काळजी घेणे हे माझ्यासाठी महत्त्वाचे काम आहे. हे अक्षरशः ‘तुझमे दूबा रहे’ या गाण्यासारखेच आहे आणि दिवसभर मी हे एवढेच करते. माझ्या आयुष्यातील आई या एका व्यस्त टप्प्याचा मी सध्या पुरेपूर आनंद घेत आहे”.