‘बिग बॉस मराठी’चं यंदाचं पर्व विशेष गाजताना दिसत आहे. यंदाच्या पर्वात सुप्रिसद्ध अभिनेता पॅडी कांबळे महत्त्वपूर्ण भूमिकेत पाहायला मिळत आहे. पहिल्या आठवड्यात पॅडी तितकासा ‘बिग बॉस’च्या घरात रुळलेला दिसला नाही. त्यामुळे भाऊंच्या धक्क्यावर रितेश देशमुख यांनी पॅडीची कानउघडणी केली. त्यांनतर मात्र दुसऱ्या, तिसऱ्या आठवड्यात पॅडीने धुमाकूळ घालायला सुरुवात केली आहे. ‘बिग बॉस’ने दिलेल्या टास्कमध्ये पॅडी हुरहुरीने खेळताना दिसला. त्याचा हा प्रवास पाहून नॉमिनेट झालेल्या पॅडीला अभिजीत सावंतने सेफ केलं. पॅडीसाठी आता त्याची खास मैत्रीण अभिनेत्री विशाखा सुभेदार यांनी लिहिलेली पोस्ट लक्ष वेधून घेत आहे. (vishakha subhedar post)
मैत्री दिनालाही विशाखा यांनी पॅडीची आठवण काढत त्याच्यासाठी खास पोस्ट शेअर करत त्याला लढण्याचा सल्ला दिला होता. त्यानंतर आता पॅडी सेफ झाला हे कळताच विशाखा यांनी त्याच्यासाठी खास पोस्ट लिहिली आहे. ही पोस्ट शेअर करत त्यांनी लिहिलं आहे की, “तुझ्यातला माणूस त्याला दिसला असावा म्हणूनच मैत्रीच पाऊल त्याने उचललं. माझा तुला पूर्ण पाठिंबा आहे. आता एकदा आपलं गाणं होऊन जाऊ दे. ‘दुःख अडवायला उंबऱ्यासारखा…’. अरे बाबा भांडणात सुद्धा तू एकदाही चूक नव्हतास. तुझे मुद्दे, फंडे स्पष्ट होते. एक संपूर्ण दिवस तू तूझा खेळ खेळत होता. कुठेही चुकीचं पाऊल, वक्तव्य नाही, कोणालाही लागेल असं स्टेटमेंट नाही. त्या पुढारीला ‘तू कोण?’ असं विचारलंस तेव्हाच टायमिंग इतकं कमाल होतं की मी मरणाची हसले”.
पुढे त्यांनी म्हटलं आहे की, “निक्कीला नडणं हे अगदी योग्य होतं कारण ही रास्त. तू तुझं काम करत नव्हतीस म्हणत तिच्यावर आवाज चढवलास मज्जा आली. आणि घूस त्या ड्रॉवरमध्ये, सूर मारणे हे खूप खास होतं. काल वर्षा ताईंची नाजूक मुद्द्यावर बाजू घेतली. ताईंनी तूझा खांदा थोपटला. डीपीची साथसुद्धा मस्त आहे. मज्जा, मस्करी, पिकनिक स्पॉटवर तू धमाल करत असणार. जे एक तासाच्या एपिसोडमध्ये पहायला मिळत नाही. पिकनिक बास्केटसुद्धा गाजव. अगदी हक्काने”.
पुढे प्रोत्साहन देत त्या असंही म्हणाल्या आहेत की, “दोन आठवडे थंड होतास, उमजत नव्हतं कोण कायं कसं आहे आणि याचा अंदाज घेत होतास. रितेशभाऊंनी तुला प्रेक्षक म्हटलं तसेच पिकनिकचे अध्यक्ष म्हटलं पण आता नाही. आता तर तू स्वार झाला आहेस. आता तुझा खरा खेळ सुरु झाला आहे. जरी तू शांत, तरी नसे तू थंड,आग आहे. आणि आम्हाला माहित आहे जीगरा आहेस”. विशाखा यांच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट करत पॅडीचं कौतुक केलं आहे.