सिनेसृष्टीत असे बरेच कलाकार आहेत ज्यांनी आपल्या कामाबरोबरच अभिनयाची आवड ही जोपासली आहे. यातील एक नाव म्हणजे विद्याधर जोशी उर्फ बाप्पा. आजवर त्यांनी त्याच्या खलनायकाच्या भूमिकेतून तसेच एखादवेळेस वडिलांच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. इतकंच नव्हे तर ‘बिग बॉस’ मराठी मध्ये त्यांनी स्पर्धक म्हणून घेतलेला सहभाग हा एखाद्या तरुण स्पर्धकाला लाजवेल असा होता. ‘बिग बॉस’मध्ये असताना त्यांनी सांगितलेलं की, ते नोकरी सांभाळून त्यांची अभिनयाची आवड जोपासत आहेत. हे ऐकून साऱ्यांना आश्चर्याचा धक्का बसला होता. विद्याधर जोशी यांनी सांगितलेलं की ते आरसीएफ म्हणजेच ‘राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स’ या कंपनीत नोकरी करतात. (Vidyadhar Joshi Birthday)
आजवर त्यांच्या अनेक भूमिका लोकप्रिय ठरल्या. ‘मी शिवाजी राजे भोसले बोलतोय’ चित्रपटात साकारलेली खलनायकाची भूमिका, तर ‘वेड’ चित्रपटादरम्यान साकारलेला प्रेमळ बाप. या साऱ्या भूमिकांना प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर उचलून धरलं. ‘वेड’ चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा मात्र बाप्पा एका खूप मोठया आजाराशी झुंज देत होते. याबाबत त्यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत भाष्य केलं.
त्यांच्या आजाराबाबत बोलताना, विद्याधर जोशी म्हणाले की, “कोरोनासारख्या महामारीत ते सापडले. त्यांना कोरोना झाला होता पण औषधांमुळे ते बरे होत होते. त्यानंतर त्यांना पुन्हा एकदा ताप आला तेव्हा तपासले असता तो कोरोनाचा ताप नसल्याचे समोर आले. काही टेस्ट केल्यावर त्यांना फुफुसांचा फायब्रोसिस आजार झाल्याचे निदान झाले. आणखी काही टेस्ट केल्यानंतर त्यांची फुफुस ही १३ टक्के निकामी झाल्याचे समोर आले होते. त्यांच्या आजारावर औषध उपलब्ध नाही. केवळ तो अधिक वाढू नये यासाठी औषध दिलं जाऊ शकतं याबद्दल विद्याधर यांना माहिती होती. तरीही त्यांनी आपल्या मालिका आणि सिनेमांचे शूटिंग पूर्ण केले.”
“एका मालिकेचं शूटिंग करताना त्यांचा हा त्रास फारच वाढला तेव्हा त्यांची दोन्ही फुफुस ही ८० ते ८५ टक्के निकामी झाल्याचे समोर आले. मात्र फुफुस प्रत्यारोपण करण्याशिवाय दुसरा कोणताही उपाय नव्हता. त्यामुळे जानेवारी महिन्यात त्यांच्यावर ती शस्त्रक्रिया करण्यात आली. त्याचवेळी ‘वेड’ सिनेमा प्रदर्शित झाला होता. हा सिनेमा त्यांना पाहता यावा म्हणून रितेश देशमुखने खास हॉस्पिटलमध्ये स्क्रीनिंगची व्यवस्थाही केली होती.”