अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी आज बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्यांमध्ये ओळखला जातो. एका छोट्याश्या गावातून आलेल्या नवाजुद्दीनला इथपर्यंत येण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागला. पण पुढे आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची मनं जिंकण्यात तो यशस्वी ठरला. ‘सेक्रेड गेम्स’, ‘गँग्स ऑफ वासेपूर’, ‘ठाकरे’ यांसारख्या चित्रपटांमध्ये त्याने काम केलं आहे. या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती. काही दिवसांपूर्वी अभिनेत्याचा ‘टिकू वेड्स शेरू’ व ‘हड्डी’ हे चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर आले होते. ज्यात त्याच्या पात्राचे कौतुक झाले होते. आता नवाजुद्दीन लवकरच एका थ्रिलर चित्रपटातून प्रेक्षकांच्या पुन्हा भेटीला येणार आहे. (Nawazuddin Siddiqui new Biopic)
नवाजुद्दीन सिद्दीकी ९० च्या दशकावर आधारित एका थ्रिलर चित्रपटात दिसणार आहे. ज्याचं दिग्दर्शन ‘सिरीयस मॅन’ फेम सेजल शाह करणार आहे. या चित्रपटात तो कस्टम अधिकारी कोस्टा फर्नांडिज यांची भूमिका साकारणार आहे. ज्यांनी गोव्यातील सोने तस्करीला आळा घातला होता. नुकतंच चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात झाली आहे. याआधी नवाजुद्दीनने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित ‘ठाकरे’ चित्रपटात मध्यवर्ती भूमिका साकारली होती. आता पुन्हा एकदा बायोपिक चित्रपटात तो महत्वाची भूमिका साकारताना दिसणार आहे.
हे देखील वाचा – “याचा पूर्णपणे दोष…”, सलग तीन फ्लॉप चित्रपटांवर रणवीर सिंहचं पहिल्यांदाच भाष्य, म्हणाला, “या काळात मी खूप…”
नवाजुद्दीनने त्याच्या आगामी चित्रपटाबद्दलचे काही फोटोज इंस्टाग्रामवर शेअर केले आहे. ज्यात त्याच्यासह दिग्दर्शिका सेजल शाह व निर्माते विनोद भानुशाली हेदेखील दिसतात. राष्ट्रीय पुरस्कार विजेते भावेश मंडालिया यांनी या चित्रपटाची कथा लिहिली आहे. “मी या चित्रपटाचा भाग बनून मला आनंद झाला आहे. ‘सीरियस मॅन’ नंतर सेजल शाह यांच्याबरोबर पुन्हा काम करण्यास मी उत्सुक आहे. हा चित्रपट आमच्या टीमसाठी आणि प्रेक्षकांसाठी एक संस्मरणीय प्रवास असेल.”, असं नवाजुद्दीन या चित्रपटाबद्दल बोलताना म्हणाला.