बॉलिवूड अभिनेता विकी कौशल त्याच्या ‘सॅम बहादूर’ चित्रपटामुळे सध्या चर्चेत आहे. भारताचे पहिले फील्ड मार्शल आणि सेनाप्रमुख सॅम माणेकशॉ यांच्या शौर्यावर आधारित असलेल्या या चित्रपटाची प्रेक्षक मोठ्या आतुरतेने वाट पाहत आहे. काही दिवसांपूर्वी चित्रपटाचा पोस्टर व टीझर प्रदर्शित झाला, जो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता. आता या चित्रपटाचा बहुचर्चित ट्रेलर अखेर समोर आला. ज्यात मध्यवर्ती भूमिका साकारणाऱ्या विकीचा लुक आणि दमदार डायलॉग्स सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. (Sam Bahadur Trailer out)
मेघना गुलझार दिग्दर्शित या चित्रपटाचा ट्रेलर विकीने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर करत एक कॅप्शन लिहिलं. “भारतीय सैन्य, राष्ट्र आणि येथील नागरिकांसाठी आम्ही देशाचे महान सैनिक सॅम माणेकशॉ यांच्या जीवनावर आधारित चित्रपटाची एक झलक दाखवत आहोत.”, असं तो यामध्ये म्हणाला. ३ मिनिटांच्या या ट्रेलरमध्ये विकी “तो एकटाच शूर आहे, जो वंचितांसाठी लढतो. जरी त्याचे तुकडे तुकडे होतात, पण तो कधीही हे मैदान सोडत नाही.”, असा डायलॉग म्हणताना दिसतो. या ट्रेलरमध्ये १९७१ मध्ये घडलेल्या भारत-पाक युद्धादरम्यान घडणाऱ्या काही परिस्थितीचे चित्रण करण्यात आले आहे. त्याचबरोबर सॅम बहादूर यांच्या जीवनातील अनेक पैलूंवरही प्रकाशझोत टाकण्यात आला आहे.
हे देखील वाचा – तुळशीला पाणी घालत होते अमिताभ बच्चन, एक चूक घडली अन्…; नेटकऱ्यांनी कमेंट करत व्यक्त केला संताप
शिवाय, माजी पंतप्रधान इंदिरा गांधी व सॅम माणेकशॉ यांच्यातील संवाद सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. या ट्रेलरमध्ये विकी कौशल सॅम बहादूर यांच्या लूकमध्ये एकदम वेगळाच दिसत असून या भूमिकेसाठी त्याने विशेष मेहनत घेतल्याचे प्रकर्षाने जाणवत आहे. एकूणच हा ट्रेलर प्रेक्षकांना प्रचंड आवडला असून विकीच्या या भूमिकेचे विशेष कौतुक होत आहे.
हे देखील वाचा – अंकिता लोखंडेला रडताना पाहून नवऱ्याने मिठी मारत काढली समजूत, अमृता खानविलकर व्हिडीओ शेअर करत म्हणते, “तू खूप…”
या चित्रपटात फातिमा सना शेख इंदिरा गांधींच्या भूमिकेत, तर सान्या मल्होत्रा सॅम माणेकशॉ यांच्या पत्नीच्या भूमिकेत दिसणार आहे. त्याचबरोबर, नीरज काबी, एडवर्ड सोनेनब्लिक, रिचर्ड भक्ती क्लेन, साकिब अयुब व कृष्णाकांत सिंग आदी कलाकारदेखील झळकणार आहेत. येत्या १ डिसेंबरला हा चित्रपट देशभरात प्रदर्शित होणार असून विकीचे चाहते व प्रेक्षक या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहे.