‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या विनोदी कार्यक्रमाने आजवर प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. या कार्यक्रमातही प्रत्येक कलाकाराने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. अशातच ‘कोळीवाड्याची रेखा’ म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री वनिता खरातने तिचा असा चाहतावर्ग निर्माण केला. वनिताने आजवर तिच्या अभिनय कौशल्याने प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडली. टेलिव्हिजन विश्वात महत्वपूर्ण काम केल्यानंतर वनिताने आपली पावलं चित्रपटसृष्टीकडे वळविली. ‘कबीर सिंग’, ‘वाळवी’ यांसारख्या दर्जेदार चित्रपटांमध्ये वनिताने काम केलं. त्यानंतर आता वनिता पुन्हा एकदा रुपेरी पडदा गाजवण्यास सज्ज होत आहे. वनिता नव्या कोणत्या भूमिकेत दिसणार? हे जाणून घेण्यासाठी तिचे चाहते खूप उत्सुक आहेत. मराठी, हिंदीनंतर वनिता दाक्षिणात्य चित्रपटामध्ये दिसणार असल्याची चर्चा रंगली आहे. (Vanita Kharat South Indian Look)
वेगवेगळ्या धाटणीच्या भूमिकांनी प्रेक्षकांची मने जिंकणाऱ्या वनिताचा ‘साऊथ इंडियन’ लूक नुकताच समोर आला आहे. तिच्या साथ इंडियन लूकमधील फोटो सध्या सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. हा लूक पाहता ती नेमकी कोणत्या चित्रपटात काम करणार आहे? असा प्रश्न पडला होता. आता या प्रश्नाला पूर्णविराम मिळाला आहे, कारण वनिता कोणत्या दाक्षिणात्य चित्रपटात झळकणार नसून ती एका मराठी चित्रपटात झळकणार आहे. आणि मराठी चित्रपटातील तिचा हा दाक्षिणात्य लूक आहे. ‘एकदा येऊन तर बघा’ या मराठी चित्रपटही वनिताच्या लूकने साऱ्यांना भुरळ घातली आहे.
येत्या २४ नोव्हेंबरला प्रदर्शित होणाऱ्या प्रसाद खांडेकर दिग्दर्शित ‘एकदा येऊन तर बघा’ या चित्रपटात वनिता दाक्षिणात्य अंदाजात दिसणार आहे. वेगळी भूमिका करण्याची संधी प्रत्येक कलाकार शोधत असतो. ‘एकदा येऊन तर बघा’ या चित्रपटाच्या निमित्ताने ही संधी मला मिळाली असून माझं हे पात्र प्रेक्षक नक्कीच एन्जॉय करतील, असा विश्वास तीने व्यक्त केला आहे. या चित्रपटात वनिताबरोबर गिरीश कुलकर्णी, सयाजी शिंदे, भाऊ कदम, तेजस्विनी पंडित, नम्रता संभेराव, प्रसाद खांडेकर, पॅडी कांबळे, ओंकार भोजने, विशाखा सुभेदार, राजेंद्र शिसातकर, शशिकांत केरकर, सुशील इनामदार, रोहित माने आदि तगड्या कलाकारांच्या भूमिका आहेत. लेखक, अभिनेता प्रसाद खांडेकर ‘एकदा येऊन तर बघा’ या चित्रपटाच्या निमित्ताने दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करत आहे.
‘एकदा येऊन तर बघा’ चित्रपटाची निर्मिती परितोष पेंटर, राजेशकुमार मोहंती, दिपक क्रिशन चौधरी, सेजल दिपक पेंटर यांची असून सहनिर्मिती अश्विन पद्मनाभन, सत्यनारायण मूरथी, डॉ.झारा खादर यांची आहे. चित्रपटाची कथा परितोष पेंटर यांची असून पटकथा, संवाद प्रसाद खांडेकर यांचे आहेत. गीते मंदार चोळकर यांची असून रोहन-रोहन, कश्यप सोमपुरा यांचे संगीत चित्रपटाला लाभले आहे.