Vaishnavi Kalyankar Ganesh Chaturthi : गणेशोत्सव हा सण सर्वत्र अगदी धुमधडाक्यात साजरा करताना पाहायला मिळत आहे. सर्वसामान्यांप्रमाणे अनेक कलाकार मंडळीही गणेशोत्सव साजरा करण्यात व्यस्त आहेत. अनेक कलाकारांच्या घरी बाप्पा विराजमान झाले आहेत. बाप्पाच्या येण्याने कलाकारांचा उत्साह वाढलेला पाहायला मिळत आहे. शुटिंगमधून वेळात वेळ काढत ही कलाकार मंडळी गणरायाचे स्वागत अगदी आनंदात करताना दिसतात. गणेशोत्सवाच्या निमित्ताने ही कलाकार मंडळी त्यांच्या कुटुंबियांनाही वेळ देताना दिसतात. यंदा अनेक कलाकारांनी त्यांच्या कुटुंबासह गणेशोत्सव साजरा केला आहे. यापैकी एक म्हणजे अभिनेत्री वैष्णवी कल्याणकर.
वैष्णवी कल्याणकरचा हा लग्नानंतरचा पहिलाच गणेशोत्सव. वैष्णवीने तिच्या लग्नानंतरच्या या गणेशोत्सवाला सासर गाठलं. वैष्णवी पती किरण गायकवाडसह सासरी पोहोचली आहे. सासरच्या घरात रमलेल्या वैष्णवीने स्वतःच्या हाताने पहिल्यांदाच उकडीचे मोदक बनवले. याचा व्हिडीओही त्यांनी सोशल मीडियावर शेअर केला. लग्नानंतरच्या पहिल्या गणेशोत्सवाला दोघेही खूप आनंदी दिसत होते.
वैष्णवी व किरण यांचा खास सणासाठी पारंपरिक लूक पाहायला मिळाला. वैष्णवीने चंद्रकोर असलेली मोरपिशी रंगाची पैठणी साडी नेसली होती. तर किरणने पांढऱ्या रंगाचा सदरा परिधान केला होता. दोघांच्या लग्नानंतरच्या पहिल्या गणेशोत्सवाला ही जोडी खूप खुश दिसली. किरण सध्या देवमाणूस ३ या मालिकेमुळे व्यस्त आहे. त्यामुळे त्याला नीट कुटुंबाला, वैष्णवीला वेळ द्यायला मिळत नाही आहे. असं असलं तरी शुटिंगच्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढत त्यांनी गणेशोत्सव साजरा केला.
बऱ्याच काळापासून किरणने वैष्णवीबरोबरचं नातं गुपित ठेवलं होतं. पण, गेल्यावर्षी २९ नोव्हेंबरला अभिनेत्याने प्रेमाची कबुली दिली. त्यानंतर काही दिवसांत किरणने लग्नाची तारीख जाहीर केली. १४ डिसेंबरला किरण-वैष्णवी लग्नबंधनात अडकले.





