Ye Re Ye Re Paisa 3 Title Song : ‘येरे येरे पैसा’ आणि ‘येरे येरे पैसा २’ या यशस्वी चित्रपटांनंतर आता प्रेक्षकांच्या मनोरंजनाची ट्रिपल डोस घेऊन ‘येरे येरे पैसा ३’ लवकरच भेटीला येत आहे. या बहुप्रतीक्षित चित्रपटाचे टायटल साँग नुकतेच एक भव्य सोहळ्याद्वारे लाँच करण्यात आले. विशेष म्हणजे या सोहळ्याला बॉलिवूडचा दबंग अभिनेता सलमान खान आणि महेश मांजरेकर याची विशेष उपस्थिती होती, ज्यामुळे कार्यक्रमाचे आकर्षण अधिकच वाढले. या वेळी सलमान खान याने गाण्याचे कौतुक करत चित्रपटाच्या संपूर्ण टीमला शुभेच्छा दिल्या. या चित्रपटाच्या जबरदस्त गाण्यात वैशाली सामंत आणि आदर्श शिंदे यांच्या दमदार आवाजाने अधिकच रंगत आणली असून अमितराज यांनी संगीताला उर्जा दिली आहे.
या चित्रपटातील इतर गाण्यांना पंकज पडघन यांचे संगीत लाभले आहे. तर हे गाणे सचिन पाठक (यो) यांनी लिहिले आहे. ‘येरे येरे पैसा ३’ या गाण्यातील सर्व कलाकारांची एनर्जी पाहून यंदाचा भाग आणखी धमाल आणि मनोरंजनाने भरलेला असणार, याबद्दल कोणतीही शंका नाही. या गाण्याबद्दल आणि चित्रपटाबद्दल सलमान खान म्हणाला की, “हे गाणे अप्रतिम झाले आहे. गाण्यावरुनच चित्रपट काय जबरदस्त असेल याचा अंदाज येतोय. चित्रपटाची संपूर्ण टीम जबरदस्त आहे. या सगळ्यांना माझ्याकडून खूप शुभेच्छा आणि या चित्रपटाच्या चौथ्या भागात मला सहभागी व्हायला नक्कीच आवडेल”.
आणखी वाचा – मराठी अभिनेत्याचं टोकाचं पाऊल, काम मिळत नसल्यामुळे आत्महत्या, चित्रपटसृष्टीही हादरली
या म्युजिक लाँच कार्यक्रमाबद्दल बोलताना दिग्दर्शक संजय जाधव म्हणाले, “येरे येरे पैसा ३’ ही केवळ फ्रँचाईजी नाही, तर प्रेक्षकांशी आमचा भावनिक संबंध आहे. या भागात अधिक मोठं, धडाकेबाज आणि थरारक काहीतरी देण्याचा प्रयत्न केला आहे”. धर्मा प्रॉडक्शन्स प्रस्तुत अमेय विनोद खोपकर पिक्चर्स, उदाहरणार्थ निर्मित, न्युक्लिअर ॲरो पिक्चर्स निर्मित या चित्रपटाची सहनिर्मिती वर्डविझार्ड एंटरटेनमेंटने केली आहे. सुधीर कोलते, ओमप्रकाश भट्ट, नासीर शरीफ, ओंकार सुषमा माने, स्वाती खोपकर, निनाद नंदकुमार बत्तीन, गिरीधर गोपाळकृष्ण धुमाळ हे चित्रपटाचे निर्माते असून सौरभ लालवाणी सहनिर्माते आहेत.
आणखी वाचा – सुप्रसिद्ध अभिनेत्रीचा धक्कादायक मृत्यू, घरात कुजलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह, शेजाऱ्यांना वास आला तेव्हा…
चित्रपटाचे दिग्दर्शन संजय जाधव यांनी केले आहे. कलाकारांच्या चमकदार यादीत संजय नार्वेकर, सिद्धार्थ जाधव, उमेश कामत, तेजस्विनी पंडित, विशाखा सुभेदार, आनंद इंगळे, नागेश भोसले, वनिता खरात, जयवंत वाडकर यांच्यासह आणखी काही चर्चित चेहरे दिसणार आहेत. ‘येरे येरे पैसा ३’चे एनर्जेटिक टायटल साँग पाहून प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. त्यामुळे आता या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहात आहेत.





