महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास व मराठी साम्राज्यासाठीचा लढा आज प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहे. छत्रपती शिवरायांनी आपल्या अचूक रणनीती व चाणाक्ष बुद्धीच्या जोरावर अनेक मोहिमा फत्ते केल्या असून छत्रपतींच्या व त्यांच्या शूरवीर मावळ्यांचा दैदिप्यमान इतिहास आज महाराष्ट्र व देश-विदेशात सांगितले जातात. दक्षिणेपासून उतरेपर्यंत आपल्या साम्राज्याचा केलेला विस्तार असो किंवा अफझलखानाचा वध, आग्र्याहून सुटका किंवा अनेक गड-किल्ल्यांची यशस्वी मोहीम, असे अनेक क्षण इतिहासाच्या सुवर्ण पानांवर लिहिले गेले आहेत. याच सुवर्ण पानांवर लिहिली गेलेली एक मोहीम म्हणजे सिंहगडाची लढाई, आणि या लढाईचे प्रमुख शिलेदार सुभेदार तान्हाजी मालुसरे.
“आधी लगीन कोंढाण्याच, आन मग माझ्या रायबाच” असं म्हणणाऱ्या सुभेदार तान्हाजी मालुसरे यांनी कोंढाणा किल्ल्यावर चढाई करत शेवटच्या श्वासापर्यंत शत्रूंविरोधात लढले. त्यांच्याशिवाय शिवचरित्र पूर्णच होऊ शकत नाही. अश्या या शिलेदारावर आधारित दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांच्या ‘श्री शिवराज अष्टक’मधील पाचवा चित्रपट ‘सुभेदार’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. याआधी चित्रपटाचे टिझर व पोस्टर प्रदर्शित झाल्यानंतर आता चित्रपटाचे नवं गाणंदेखील प्रेक्षकांच्या भेटीला आलेलं असून याचबरोबर चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखही बदलली आहे. (subhedar movie)
‘सुभेदार’ चित्रपटातील नवं गाणं आलं समोर (subhedar movie new song release)
“‘मावळं जागं झालं रं…” असं या गाण्याचे नाव असून देवदत्त बाजी व अवधूत गांधी यांनी हे गाणं गायलेलं असून हे गीत दिग्पाल लांजेकर यांनी लिहिलंय. तर देवदत्त बाजी यांनी या गाण्याला संगीत दिलंय. अभिनेता व चित्रपटाचे सहनिर्माते चिन्मय मांडलेकर यांनी या गाण्याचा एक व्हिडिओ आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट करून लिहिलंय, “सह्याद्रीला आज येतीया जाग, दख्खनचा गर्व ह्ये शिवाजी राजं.. सादर आहे सुभेदार मधील पहिलंवहिलं, आपल्या सर्वांचं गाणं ‘मावळं जागं झालं रं…’!” त्याचबरोबर चिन्मय यांनी चित्रपटाच्या प्रदर्शनाची नवी तारीखही सांगितली असून आता हा चित्रपट १८ ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. (subhedar movie new song release)
सुभेदार तान्हाजी मालुसरे यांचा सिंहगडावरील पराक्रम या चित्रपटात उलगडला जाणार असून यात अभिनेते अजय पुरकर हे सुभेदार तान्हाजी मालुसरेंच्या भूमिकेत दिसणार आहे. त्याचबरोबर चिन्मय मांडलेकर, मृणाल कुलकर्णी, समीर धर्माधिकारी, स्मिता शेवाळे, अभिजीत श्वेतचंद्र, विराजस कुलकर्णी, आस्ताद काळे, ऋषी सक्सेना, शिवानी रांगोळे, मृण्मयी देशपांडे व अन्य कलाकारही दिसणार आहे. (subhedar new song release & release date changed)
हे देखील वाचा : रायबाची लगीन सराई, सजलं मालुसरे कुटुंब