Thackeray brothers reunion : गेल्या काही दिवसांपासून राज्यात हिंदी भाषेची सक्ती आणि त्रिभाषा सूत्र लागू करण्याच्या मुद्यांवरुन चांगलंच राजकारण सुरु असलेलं पाहायला मिळालं. हिंदी भाषा सक्तीचा निर्णय राज्य सरकारने रद्द केल्यानंतर जल्लोष करण्यासाठी शिवसेना (ठाकरे) आणि मनसेच्यावतीने आज मुंबईत विजयी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे अनेक वर्षांनंतर एका व्यासपीठावर आले आणि या मेळाव्याची शानच बदलली. संबंध महाराष्ट्राच्या नजरा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे लागून राहिल्या होत्या.
वरळी येथील विजयी सभेला इतर पक्षाचेही काही नेते उपस्थित आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या सुप्रिया सुळे, रासपचे महादेव जानकर, माजी खासदार भालचंद्र मुणगेकर असे अनेक नेते यावेळी उपस्थित आहेत. हिंदी सक्तीबाबत बोलताना राज ठाकरे म्हणाले कुणालाही न विचारता हिंदी सक्ती कशासाठी? तुमच्याकडे सत्ता आहे म्हणून का? तुमची सत्ता विधानभवनात. इथं रस्त्यावर आमची सत्ता आहे, असे राज ठाकरे यांनी थेट सुनावलं.
राज ठाकरेंच्या भाषणाच्या सुरुवातीलाच त्यांनी केलेलं एक वक्तव्य या जल्लोष सोहळ्याची शान ठरलं. राज ठाकरे म्हणाले की, “आम्हा दोघा भावांना एकत्र आणणं बाळासाहेबांना जमलं नाही ते देवेंद्र फडणवीस यांनी करुन दाखवलं, असं म्हणत राज ठाकरे यांनी आपल्या भाषणाची जोरदार सुरुवात केली. राज ठाकरे यांच्या या वाक्यावर उपस्थितांच्या टाळ्या काही वेळ सतत सुरु होत्या. आज या ठाकरे बंधूंचा हाच मेळावा पाहण्यासाठी गेली कित्येक वर्ष प्रत्येक मराठी माणूस आतुरतेने वाट पाहत होता.





