प्रत्येकाच्या आयुष्यातली अत्यंत महत्त्वाची मात्र तितकीच गृहित धरली जाणारी ही दोन हक्काची माणसं म्हणजे आई आणि बाबा. आयुष्यभर खस्ता खाऊन आई-वडील आपल्या मुलांना लहानाचं मोठं करतात. मुलं शिकून स्वतःच्या पायावर उभी राहतात, त्यांच्या संसारात रमूनही जातात. आई-वडील मात्र घरच्या जबाबदारीतून कधीही रिटायर होत नाहीत. मुलं, त्यांचं शिक्षण, त्यांची नोकरी, त्यांचं लग्न आणि नंतर नातवंडं… एकामागोमाग येणाऱ्या या जबाबदारीच्या चक्रात ते नकळतपणे अडकून जातात. आई आणि बाबा रिटायर होत आहेत ही मालिका देखील अशाच एका फिरते ज्यांना खरेतर घरच्या जबाबदाऱ्यांमधून निवृत्त व्हायचे आहे, मात्र न संपणाऱ्या जबाबदाऱ्यांमध्ये ते अडकले जातात. अशाच आपल्या आई-वडिलांच्या आठवणीत अभिनेत्री निवेदिता सराफ रमल्या. (Nivedita Saraf on Her Father’s Death)
‘आई आणि बाबा रिटायर होत आहेत’ या मालिकेच्या निमित्ताने पत्रकारांशी साधलेल्या संवादात निवेदिता यांनी आपल्या आई-वडिलांबद्दल भाष्य केलं. यावेळी त्यांनी असं म्हटलं की, “कलाकार म्हणून जेव्हा तुम्ही काम करत असता तेव्हा मालिकेचे निर्माते किंवा तंत्रज्ञ मंडळी यांनी बरंच काम केलेलं असतं आणि मग ते आमच्यापर्यंत पोहोचलेले असतात. मालिकेची गोष्ट ही आधीच ठरलेली असते, तेव्हा तुम्ही सीन करायला उभे असता तेव्हा व्यक्ती म्हणून तुम्ही तुमचे अनुभव सांगत असता आणि त्याच्यावर विचार केला जातो. आता माझ्या बाबतीत म्हणाल तर माझे बाबा खूप लवकर गेले”.
यापुढे त्या असं म्हणाल्या की, “वयाच्या ४० व्या वर्षी ते आम्हाला सोडून गेले. वडिलांच्या निधनानंतर माझ्या आईने माझा सांभाळ केला. तर तिला मी बऱ्याच वर्षांपर्यंत रिटायर होऊ दिलं नाही. त्यानंतर ती काही गोष्टी विसरु लागली. तेव्हा मला खूप मोठा धक्का बसला कारण तेव्हा माझ्या लक्षात आले की आता आपली आई मानसिकरित्या आपल्याबरोबर नसणार आहे. असे वेगवेगळे अनुभव आपल्याला आयुष्यात येत असतात”.
‘आई आणि बाबा रिटायर होत आहेत!’ ही बहुप्रतीक्षित मालिका दुपारच्या सत्रात प्रसारित केली जाणार आहे. ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर २ डिसेंबर म्हणजेच आजपासून सोमवार ते शनिवार दुपारी २.३० वाजता ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मालिकेच्या यापूर्वीच्या प्रोमोमध्ये निवेदिता आणि मंगेश कदम हे दोघंही रिटायरमेंट नंतर आयुष्य कसं जगायचं यावर चर्चा करत असल्याचं पाहायला मिळालं होतं.