कलाविश्वात काम करणारी मंडळी त्यांच्या कलेविषयी प्रचंड प्रामाणिक असतात. भूक-तहान विसरुन प्रेक्षकांचं मनोरंजन करत असतात. कित्येकदा तर कलाकारांना त्यांच्या कुटुंबियांनाही फारसा वेळ देता येत नाही. कुटुंबियांपासून दूर राहण्याचाही अवघड निर्णय घ्यावा लागतो. पण काही कलाकार परिस्थितीनुसार किंवा त्यांच्या इच्छेनुसार कुटुंबियांना पहिलं प्राधान्य देतात. त्यातीलच एक अभिनेता म्हणजे स्वप्निल राजेशखर. ‘तुला शिकवनी चांगलाच’ धडा फेम स्वप्निल यांनी कामालाही प्राधान्य देत कुटुंबाबरोबर एकत्रित राहण्याचं स्वप्न पाहिलं. ते त्यांनी पूर्णही केलं. याचबाबत स्वप्निल यांनी उघडपणे भाष्य केलं आहे.
ITSMAJJA च्या ‘हॅशटॅग ठाकुर विचारणार’ या कार्यक्रमात स्वप्निल यांनी हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी त्यांच्या करिअरबाबत तसेच वैयक्तिक आयुष्याबाबात दिलखुलासपणे भाष्य केलं. यावेळी स्वप्निल यांनी त्यांच्या लग्नाबाबत सांगितलं. अगदी विशीमध्ये त्यांचं लग्न झालं. कलाक्षेत्रात काम करत असतानाही स्वप्निल यांनी इतक्या लवकर लग्न का केलं? हेही समोर आलं.
२१व्या वर्षी लग्न, २५शीमध्ये दोन मुलं कारण…
स्वप्निल म्हणाले, “माझं लग्न लवकर झालं. २१व्या वर्षी माझं लग्न झालं. माझं लव्हमॅरेज होतं. २२व्या वर्षी मला मुलगी झाली. २५ वर्षांचा होईपर्यंत मला दोन मुलं होती. तोच करिअरचा घडण्याचा काळ असतो. माझे आई-वडील दोघंही कलाकार होते. त्यातही आई समाजकार्यात असायची. त्यामुळे माझं लहानपण खूप एकट्यात गेलं. माझे आई-वडील दोघंही फिरतीवर असायचे. माझं लग्न झाल्यानंतर कुटुंब म्हणून आम्ही सगळे एकत्र आलो व स्थिरावलो. लवकर लग्न करण्यामागे माझं हेदेखील एक कारण आहे. माझ्या लहानपणी जो एकटेपणा मला अनुभवायला लागला तो माझ्या मुलांना नको. त्या वयात मुलांजवळ वडील हवेत असंही माझं मत होतं. हे कौटुंबिक आयुष्य मला खूप उशीरा मिळालं”.
आणखी वाचा – “याबाबत मला वैयक्तिक…”, CID मधून एक्झिट घेण्याबाबत शिवाजी साटम यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, “सध्या मी…”
“ते सगळं छान कौटुंबिक आयुष्य तसंच ठेऊन मला मुंबईला यायचं नव्हतं. तेव्हा कोल्हापुरातील सिनेमा तर संपतच आला होता. पण बदलत्या काळानुसार विदर्भ, मराठवाडा येथील लोकांनाही सिनेमा करायचे होते. आर्थिक परिस्थिती त्या भागांतही सुधारत होती. मग अशा चित्रपटांमध्ये मला काम करण्याची संधी मिळत होती. अशावेळी १०-१२ दिवसांचं शूट करायचो. पुन्हा कोल्हापुरात येऊन कुटुंबाबरोबर वेळ घालवायचो. तेव्हा मी मुंबईला यायचा आळस केला. १९९५मध्ये मुंबईत येऊन मी राजू दादांच्या मालिकेत काम केलं. त्यानंतर थेट २००७मध्ये मी मुंबईत येऊन मालिका केली. म्हणजे ११ वर्षांनंतर मी मुंबईत काम करत होतो”. यावरुनच स्वप्निल एक परफेक्ट फॅमिली मॅन आहेत हे लक्षात येतं.