नवीन वर्ष संपता संपता ख्रिसमस साजरा केला जातो. जगभरात सर्व धर्मीयांकडून ख्रिसमस मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या ख्रिसमसच्या दिवशी सांता सर्वांना भेट देतो अशी आख्यायिका आहे. काही जणांसाठी त्यांचे वडील हेच त्यांचे सांता असतात. असंच आपल्या वडिलांना सांता मानणारे अभिनेते म्हणजे तुला शिकवीन चांगलाच धडा फेम अभिनेते स्वप्नील राजशेखर. स्वप्नील हे मराठी सिनेइंडस्ट्रीतले दिवंगत अभिनेते राजशेखर यांचे चिरंजीव आहेत. दिवंगत अभिनेते राजशेखर यांनी मराठी तसेच हिंदी चित्रपटांमध्ये विविधांगी भूमिका साकारल्या आहेत. राजशेखर यांचं २५ डिसेंबर २००५ रोजी निधन झालं. आज त्यांना जाऊन १९ वर्षे झाली आहेत. (Swapnil Rajshekhar emotional post)
राजशेखर यांचं २५ डिसेंबर २००५ रोजी निधन झालं. आज त्यांना जाऊन १९ वर्षे झाली आहेत. वडिलांच्या आठवणीत भावुक होत स्वप्नील यांनी पोस्ट शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. इन्स्टाग्रामवर वडिलांचा फोटो शेअर करत राजशेखर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. या पोस्टमध्ये त्यांनी असं म्हटलं आहे की, आज एकोणीस वर्ष झाली आमचा सांता जाऊन… काळ सरत राहिला, वर्ष उलटत राहीली.. आयुष्य पुढे सरकत राहिलं…सुखदुःख येत राहिली. २५ डिसेंबर २००५ च्या सकाळी पोटात आणि आयुष्यात पडलेला खड्डा आजही तसाच आहे. तो भरला नाही, कधी भरणारही नाही”.
यापूढे त्यांनी असं म्हटलं आहे की, “डोक्यावरचं आभाळ फाटलं, पायाखालची जमीन निसटली, पोकळी निर्माण झाली या आणि अशा पुस्तकी उपमा किती थिट्या आहेत हे आपला बाप या जगात नसण्याचं क्षणोक्षणी जाणवावं अशी भावना आहे. गेली १९ वर्ष सतत एक विचार मन पोखरत रहातो की, पप्पा होते तेव्हा किती संधी होती माझ्याकडे त्यांना भरभरून भेटायची, बोलायची, त्याना स्वतःमधे साठवुन घेण्याची आणि किती निरर्थक, निरुपयोगी आणि भंगार गोष्टीत वेळ घालवला असेल मी पप्पा हयात असताना त्यांना वेळ न देता”.
यापुढे स्वप्नील यांनी असं म्हटलं आहे की, “उद्या कधी टाईम ट्रॅव्हल शक्य झाला तर मी त्यांचं जाणं थांबवणार नाही कदाचीत, पण त्याआधीचा मॅक्सीमम काळ पप्पांच्या बरोबर घालवेन… त्यांचा स्पर्श आणखी आणखी साठवेन स्मृतीत. तो उबदार आश्वासक स्पर्श..मी आहे रे.. तु जिंकलास, हरलास, पडलास, चुकलास, माती खाल्लीस, रडलास,.. सगळ्यात मी आहे तुझ्याबरोबर. हे सांगणारा. पप्पा तसे सोबत आहेत म्हणा..गरजेच्या वेळी डोळे मिटुन हात पुढे केला की त्यांचा स्पर्श हातात शब्दशः जाणवतो”.
आणखी वाचा – मुलाला शाळेतच न पाठवणारी आई, नेमकं कसं सुरु आहे लेकाचे शिक्षण?, जाणून घ्या रंजक प्रवास…
यानंतर स्वप्नील यांनी असं म्हटलं आहे की, “सुदैवाने तेवढी पोतडी भरलेलीय आपली… बाकी तो चलता है.. दुनिया है.. पण १९ वर्षात एक झालंय, कोणाचेही आई-वडील गेल्याचं कळलं, की माझ्याही आतमधे तुटतं काहीतरी… त्याच्याबद्दल कणव दाटुन येते. हल्लीच एका सुहृदाचे वडील गेले. मी ठरवुन बऱ्याच दिवसांनी भेटलो त्याला. बाकी काही बोलण्यासारखं नव्हतच. मी त्याच्या पाठीवर हात ठेवुन “वेलकम टू द क्लब” म्हणालो. तो खोल बघत राहिला माझ्याकडे”…