आजच्या या स्पर्धात्मक युगात आपला मुलगा-मुलगी कायमच सर्वांपेक्षा पुढे असावेत, ते कायमच सर्व क्षेत्रात अग्रेसर असावेत असा प्रत्येक आई-वडिलांचा अट्टहास असतो आणि त्यामुळे प्रत्येक आई-वडील आपल्या मुलांच्या चांगल्या शिक्षणासाठी मेहनत घेताना दिसतात. मात्र एक अशीही आई आहे जिने आपल्या मुलाला कधी शाळेतच पाठवलं नाही. ही आई स्वतः उच्चशिक्षित आहे, मात्र आपल्या लेकराला तिने आजवर शाळेत पाठवलच नाही आणि ही आई म्हणजे अमृता जोशी आमडेकर. ‘मज्जा पिंक’ला दिलेल्या खास मुलाखतीत अमृता यांनी त्यांच्या व त्यांच्या मुलाच्या या अद्भुत प्रवासाबद्दल सांगितलं होतं. (Amruta Joshi Amdekar Marathi News)
या प्रवासात अमृता जोशी आमडेकर यांना अनेक टीका व टोमणे सहन करावे लागले. पण लोकांच्या या टीका-टोमण्यांना न जुमानता त्यांनी आपल्या मुलाला योग्य ते आणि परिपूर्ण शिक्षण दिलं आहे. यावेळी अमृता यांनी असं म्हटलेलं की, “त्याने एक-दोन वर्षे शाळा अनुभवली आहे. आधी तो इंटरनॅशनल शाळेत होता व नंतर त्याने आय.सी.एस.सी. बोर्डाची शाळा अनुभवली आहे. यादरम्यान त्याला आम्ही Homeschooling करत होतो. मात्र एके दिवशी त्याने येऊन सांगितलं की, त्या शाळेपेक्षा आपली Homeschooling जास्त आवडते”.
यापुढे अमृता यांनी असं म्हटलेलं की, “लग्नाच्या आधी मी माझे शिक्षण घेत असताना एके ठिकाणी वाचलं होतं की, अमेरिकेत एका आई-वडिलांनी त्यांच्या मुलाला शाळेत न् पाठवताच Homeschooling द्वारे शिक्षण दिले. त्यामुळे मीही माझ्या मुलाला शाळेत न पाठवता माझ्या मुलाला Homeschooling चं शिक्षण देणार असं ठरवलं होतं. मात्र लग्नानंतर मी जे ठरवलं होतं ते सगळं विसरून गेले आणि मीसुद्धा त्याला शिक्षण देण्याच्या शर्यतीत लागले. पण या सगळ्यात शिक्षण मिळत नव्हतं असं मला वाटलं आणि मग त्याला Homeschooling देण्याचा माझा प्रवास सुरु झाला”.
यापुढे अमृता यांनी Homeschooling ची संकल्पना समजावून सांगताना असं म्हटलं की, “Homeschooling म्हणजे सानुकूलित शिक्षण (customized education). आपल्याला सगळ्या गोष्टी customized म्हणजेच आपल्या सोयीनुसार मिळत आहेत. त्याच उद्देशाने ही Homeschooling ची पद्धत सुरु झाली. पण मग शिक्षण व्यवस्थेचा भाग होण्यासाठी दहावी, बारावीची परीक्षादेखील देता येते. Homeschooling मध्ये इतर शिक्षणासह या शिक्षणपद्धतीचा अभ्यासही चालूच असतो.”