‘झी मराठी’ वाहिनीवरील सर्वच मालिका प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करत आहेत. या मालिकांमधील ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिकेलाही प्रेक्षक भरभरुन प्रतिसाद देताना दिसत आहेत. एकामागोमाग मालिकेत येणाऱ्या रंजक वळणांनी ही मालिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस पडत आहे. मालिकेच्या कथानकाने या मालिकेच्या प्रेक्षकवर्गाला जोडून ठेवलं आहे. मालिकेतील अक्षरा व अधिपतीच्या जोडीला तर प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर उचलून धरलं आहे. अक्षरा-अधिपतीची केमिस्ट्री प्रेक्षकांना नेहमीच आवडते. (Tula Shikvin Changlach Dhada Promo)
अक्षराच्या सासूबाईंचा म्हणजे भुवनेश्वरीचा सूनेवर राग असतो. मात्र भर कार्यक्रमात अक्षराने सासूबाईंची बाजू घेतल्यामुळे अक्षराबद्दल भुवनेश्वरीच्या मनात असलेला गैरसमज दूर होतो. त्यांनतर भुवनेश्वरी अक्षराचा सून म्हणून स्वीकार करते. अक्षरा चारुहासलाही भुवनेश्वरीबरोबर असलेल्या त्याच्या नात्याची जाणीव करून देते,. त्यानंतर अक्षराचं म्हणणं पटल्यानंतर चारुहास भुवनेश्वरीची माफी मागतो. तर इकडे हे ऐकून अधिपतीचा आनंदही गगनात मावेनासा होतो.
मालिकेत अधिपतीला पुन्हा एकदा अभ्यासाची गोडी निर्माण झाली असल्याचं पाहायला मिळत आहे. अभ्यासात तो गुंतत चालला असल्याचं दिसताच अक्षरा अधिपतीचा परीक्षेचा फॉर्म भरते. मात्र अधिपतीला शिक्षण द्यायचं नाही असा भुवनेश्वरीचा डाव असतो. मात्र अक्षरा हा डाव पलटवत अधिपतीला शिक्षणाचं महत्त्व पटवून देते. अधिपतीही परीक्षेसाठी सज्ज असतो. अक्षरा अधिपतीचा परीक्षेचा फ़ॉर्म भरून त्याला अभ्यासाला सुरुवात करायाला सांगते.
अधिपती परीक्षेला बसणार ही गोष्ट भुवनेश्वरीला समजते, तेव्हा तिला खूप मोठा धक्का बसतो. अधिपती परीक्षा देणार हे ऐकताच भुवनेश्वरीवरच्या चेहऱ्याचा रंग उडतो. त्यानंतर अक्षरा भुवनेश्वरीला सांगते की, “इतकी वर्ष जो तुमचा मुलगा तुमच्यासमोर असून हरवला होता, तो तुम्हाला सापडेल”, असं म्हणते. हे ऐकून भुवनेश्वरी म्हणते, “पण ज्यांनी हे त्यांना करायला लावलं त्यांना त्याचे परिणाम भोगायला लागणार”, असं म्हणताना दिसते. आता भुवनेश्वरी अधिपतीला परीक्षा देऊ देणार का?, भुवनेश्वरी अधिपतीच्या परीक्षेत अडथळा निर्माण करेल का?, हे मालिकेच्या येणाऱ्या भागात पाहणं रंजक ठरेल.