‘झी मराठी’वरील ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ ही मालिका काही लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. मालिकेतील नवनवीन ट्विस्ट्समुळे ही मालिका प्रेक्षकांची आवडती मालिका बनली आहे. अक्षरा-अधिपतीच्या जोडीला प्रेक्षकांनी अल्पावधीतच भरभरून प्रतिसाद दिला. त्यामुळे येणाऱ्या प्रत्येक भागात नवीन काय पाहायला मिळणार? याबद्दल प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण झालेली असते.
मालिकेच्या कथानकानुसार, अधिपतीने नुकतेच अक्षराला घरातून बाहेर काढले होते. मात्र आता त्याला त्याची चूक समजली असून ‘व्हॅलेंटाईन डे’च्या निमित्ताने अधिपती अक्षराची माफी मागणार आहे. याचा एक प्रोमो सोशल मीडियावर शेअर करण्यात आला असून या प्रोमोला नेटकऱ्यांनी लाईक्स व कमेंट्सद्वारे चांगलाच प्रतिसाद दिला आहे.
अधिपती अक्षराला घराबाहेर काढण्याच्या या नवीन ट्विस्टवर अनेक प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली होती. अशातच आता अधिपती अक्षराची माफी मागत असल्याच्या या नवीन प्रोमोवरही नेटकऱ्यांनी कमेंट्सद्वारे प्रतिसाद दिला आहे. या नवीन प्रोमोवर नेटकऱ्यांनी अधिपतीच्या विरुद्ध अनेक नकारात्मक कमेंट्स केल्या आहेत. तसेच काहींना हा प्रोमो आवडला असल्याचेही म्हटले आहे.

या प्रोमोखाली एका नेटकऱ्याने असं म्हटलं आहे की, “हाताला घरातून बाहेर काढलं आणि आता माफी? सन्मान ठेवा स्त्रीचा, मालिका जरी असली तरी तुमचा संदेश लोकांपर्यंत जातो.” तर आणखी एकाने “आधी हाताला धरून बाहेर काढतो हा आईचा बैल आणि आता सॉरी म्हणत आहे. माफ करा पण अक्षराला बाहेर काढलं तेव्हाच तुमची मालिका फ्लॉप झाली.”
तसेच काही नेटकऱ्यांनी “अधिपती हा खूपच आईवेडा दाखवला आहे, अक्षराने अजिबात अधिपतीला माफ करू नये, अधिपती चुकला आहे, त्यामुळे अक्षराने अजिबात माफ करू नये.” मालिकेतील या नवीन ट्विस्टमुळे अक्षरा अधिपतीला माफ करणार का? आणि मालिकेत आता पुढे काय होणार? याची उत्सुकता लागली आहे.