भारतीय क्रिकेट संघाचा माजी फलंदाज अंशुमन गायकवाड सध्या कर्करोगाशी झुंज देत आहेत. त्यांना ब्लड कॅन्सर झाला असून ते लंडनमध्ये उपचार घेत होते. मात्र आर्थिक स्थिती कमकुवत झाल्याने ते बरोड्यात परतले आहेत आणि तिथे त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. त्यांच्या आर्थिक स्थितीमुळे बीसीसीआयने एक पाऊल पुढे येत त्यांना मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी बीसीसीआयला अंशुमन गायकवाडला आर्थिक मदत देण्यासाठी तातडीने एक कोटी रुपये जारी करण्याचे निर्देश दिले. जय शाह यांनी गायकवाड यांच्या कुटुंबीयांशीही बोलून परिस्थितीचा आढावा घेतला आणि मदत जाहीर केली. याबाबत बीसीसीआयच्या सर्वोच्च परिषदेने माहिती दिली.
अंशुमन गायकवाड यांना ही मदत जाहीर होताच या मदतीवर अनेक संमिश्र प्रतिक्रिया येता आहेत. अनेकांनी बीसीसीआयच्या निर्णयाचे कौतुक केलं आहे. तर अनेकजण या निर्णयावर नाराज आहेत की काय असं वाटत आहे. याबद्दल एका मराठी अभिनेत्यानेही पोस्ट शेअर केली आहे. झी मराठी वाहिनीवरील ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिकेतील चारुहास म्हणजेच स्वप्नील राजशेखर यांनी पोस्ट शेअर केली आहे. स्वप्नील यांनी त्यांच्या फेसबुक पोस्टद्वारे याबद्दल त्यांची प्रतिक्रिया दिली आहे.
या पोस्टद्वारे स्वप्नील यांनी असं म्हटलं आहे की, “क्रिकेटर अंशूमन गायकवाड यांना बीसीसीआयकडून उपचारासाठी १ कोटीची मदत मिळाली आहे. याचा खूप आनंद आहे. इथे वृद्ध तंत्रज्ञ कलावंतांसाठी हजारात रक्कम जमावताना धाप लागते”. या पोस्टद्वारे स्वप्नील यांनी बीसीसीआयच्या आर्थिक मदतीबद्दल कौतुक केलं असलं तरी मनोरंजन क्षेत्रातील कलाकारांच्या मानधनाबद्दल. तसेच त्यांच्या निवृत्तीनंतरच्या परिस्थितीवर भाष्य केलं आहे.
दरम्यान, अंशुमन गायकवाड यांनी भारताकडून खेळण्याबरोबरच त्यांनी संघाचे प्रशिक्षकपदही भूषवले आहे. १९९७ ते १९९९ आणि पुन्हा २००० मध्ये त्यांनी भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून काम पाहिले. बीसीसीआयने गायकवाड यांच्या उपचारासाठी मदत करण्याची घोषणा केली आहे.