मराठी सिनेसृष्टीतील अनेक कलाकार मंडळी या सामाजिक भान जपताना दिसतात. अनेक कलाकार राजकीय व सामाजिक परिस्थितीवर अगदी उघपणे भाष्य करतात. काहीजण या प्रश्नांवर उपरोधिकपणे भाष्य करतात. रस्त्यावरचे खड्डे आणि त्यामुळे येणाऱ्या समस्या हाही एक गंभीर प्रश्न आहे. या प्रश्नावरही अनेकांनी सोशल मीडियाद्वारे आपली मतं व्यक्त केली आहेत. अशातच आता रस्त्यावरील खड्ड्यांवर ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मालिका फेम अभिनेते स्वप्नील राजशेखर यांनी भाष्य केलं आहे. सोशल मीडियावर उपरोधिक व्हिडीओ शेअर करत त्यांनी रस्त्यावरील खड्ड्यांबाबत भाष्य केलं आहे. नुकत्याच शेअर केलेल्या एका व्हिडीओने त्यांनी सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. गाडी चालवतानाच रस्त्यावरील खड्ड्यांबाबत त्यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. (swapnil rajasekhar on road potholes)
स्वप्नील राजशेखर यांनी या व्हिडीओमध्ये असं म्हटलं आहे की, “काहीजण रोज उठून रस्त्यावरच्या खड्ड्यांच्या नावाने बोटं मोडतात. त्या सगळ्यांना मला एक सांगायचं आहे. अहो… वर्षानुवर्षे, महिनोंमहिने हे सगळे खड्डे जपलेत, राखलेत हे सगळं उगाचाच नाही. यामागे एक विचार आहे. तो विचार समजून घ्या. किती अशी माणसं आहेत, ज्यांचं अगदी बुळबुळीत रस्त्यासारखं आयुष्य आहे. तुमच्या-माझ्या रोजच्या जगण्यामध्ये कितीतरी खड्डे-डबरे येतात. महागडी गाडी खरेदी केलेली असते, हेल्थ विमा काढलेला असतो. दर महिन्याला याचा हफ्ता भरायचा असतो. दर आठडव्याच्या शेवटी बायको-मुलांना घेऊन हिल स्टेशनला जावं लागतं. किती मोठा खड्डा पडतो. मावस मेहुणीला महागडं गिफ्ट द्यावं लागतं. आपलं पोरगं पहिलीतून दुसरीत जाताना इंग्रजी शाळेची फी भरावी लागते, या सगळ्यात मागे हटून चालणार नाही. म्हणून हे खड्डे”.
यापुढे त्यांनी कोल्हापुरमधील वृद्ध माणसचं खड्ड्यामुळे जीवंत झाल्याचं उदाहरण देत असं म्हटलं की, “परवा आमचे एक आजोबा गेले असं डॉक्टरांनी घोषित केलं. त्यांचा मृतदेह रुग्णवाहिकेतून लोक घरी घेऊन जात होते. वाटेत एक खड्डा आला, रुग्णवाहिका आदळली आणि आजोबा दाणकन् उठून बसले. गेलेला माणूस परत आला… लक्षात घ्या, एका माणसाचा जीव वाचला या खड्ड्यांमुळे… लोक उठतात आणि रस्ते बाद आहेत म्हणून शिव्या घालतात पण, आता आपणच समजलं पाहिजे… प्रत्येकाच्या आयुष्यात खड्डा पाहिजे म्हणून तो ठेवला आहे”. हे सर्व त्यांनी उपरोधिकपणे कोल्हापुरी भाषेत म्हटलं आहे.
आणखी वाचा – ‘बिग बॉस’ फेम अभिनेत्री दुसऱ्यांदा झाली आई, गोंडस मुलाला दिला जन्म, व्हिडीओद्वारे व्यक्त केला आनंद
दरम्यान, काही दिवसांपूर्वी अभिनेते केरळ फिरायला गेले होते. यावेळी त्याठिकाणचं निसर्गसौंदर्य, स्वच्छता पाहून स्वप्नील राजशेखर भारावून गेले होते. यावेळी त्यांनी उपरोधिक पोस्ट शेअर करत एका वेगळ्या अंदाजात आपल्याकडे सुद्धा पर्यटनस्थळी स्वच्छतेच्या बाबतीत बदल झाला पाहिजे असं सूचित केलं होतं. आता पुन्हा एकदा स्वप्नील राजशेखर यांनी रस्त्यांवरील खड्ड्यांबाबत आपलं मत व्यक्त केलं आहे आणि त्यांच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनीही “वाह भाई वाह”, “आता काय बोलावं बाबा या बोलण्याला?”, “विषय हार्ड आहे हो तुमचा” अशा अनेक कमेंट्स केल्या आहेत.