छोट्या पडद्यावरील ‘तुजविण सख्या रे’ व ‘अवघाची संसार’ या मालिकांची लोकप्रियता आजही कायम आहे. या मालिकांनी प्रेक्षकांच्या मनात अक्षरश: घर केले. या मालिकेच्या कथानकासह शीर्षक गीतांनी साऱ्यांनाच वेड लावले. याच मालिकांतून लोकप्रिय झालेली अभिनेत्री म्हणजे कादंबरी कदम. कादंबरीची ‘तुजविण सख्या रे’ ही मालिका विशेष गाजली होती.
मालिका, चित्रपट व नाटक अशा तिन्ही माध्यमांत काम करत कादंबरीने प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. कादंबरीची ‘इंद्रधनुष्य’ मालिकेत वंदना ही बालकलाकाराची भूमिका चांगलीच गाजली होती. या मालिकेला चांगलीच लोकप्रियता मिळाली होती. मात्र ही मालिका गाजल्यानंतर एक वर्ष कादंबरीकडे काहीही काम नव्हते. याबद्दल स्वत: अभिनेत्रीने भाष्य केले आहे. ‘इंद्रधनुष्य’ या मालिकेची लोकप्रियता तशी अफाट होती. मात्र या मालिकेनंतर तिला काही संघर्षदेखील करावा लागला होता असं तिने म्हटलं आहे.
‘आरपार’ला दिलेल्या मुलाखतीत कादंबरीने असं म्हटलं आहे की, “‘इंद्रधनुष्य’ ही मालिका खूप गाजली होती. या मालिकेत आम्ही सहा-सात बहिणी होतो. त्यापैकी कुणी फार काही केलं नाही. म्हणजे मी त्यानंतर काही मालिका केल्या आणि मीता सावरकर तेव्हा जाहिराती करत होती. पण त्या मालिकेनंतर आम्हाला फार पटापट कामे मिळाली नाहीत. त्यामुळे हा माझ्यासाठी खूप संघर्षाचा काळ होता.”
यापुढे तिने असं म्हटलं की, “या पडत्या काळात मी एक वर्ष नोकरी केली. ‘इंद्रधनुष्य’सारखी मालिका केल्यानंतरही मला काय करावं हेच कळत नव्हतं. त्यानंतर मी माझे पदवीचे शिक्षण पूर्ण केले आणि शिक्षण पूर्ण केल्यानंतर मला घरी बसायचे नव्हते. कारण घरात बसून राहणे हे खूपच निराशाजनक आहे. त्यामुळे मी एक नोकरी केली आणि मग ‘अवघाची संसार’ मालिका सुरु झाल्यानंतर माझी गाडी पूर्वपदावर आली.”
यापुढे तिने तिच्या मुलाच्या जन्मानंतरच्या संघर्षाबद्दलदेखील सांगितले. यावेळी तिने असं म्हटलं की, “कार्तिकच्या जन्मानंतर मी काही लोकांना कामासाठी फोन केले. मी त्यांना मला आता काम हवं आहे. काही असेल तर सांगा. मी आता लहान नाही दिसत, त्यामुळे माझी ऑडीशन घ्या. असं म्हटलं आहे. मला कायमच वाटायचं की, तुम्ही एक काम चांगलं केल्यानंतर पुढेही तुम्हाला काही चांगली कामे मिळतात. पण तसं काही नसतं.”