तीन वर्षांपूर्वी एका अभिनेत्याच्या मृत्यूने संपूर्ण मनोरंजन विश्वाला धक्का बसला होता. हा अभिनेता म्हणजे सुशांत सिंह राजपूत. त्याने राहत्या घरी गळफास लाऊन आत्महत्या केली होती. नैराश्यामध्ये असल्याने त्याने आत्महत्या केल्याचे अंदाज बांधले जात होते. पण त्याच्या आत्महत्येचे खरे कारण अद्याप समोर आले नाही. अशातच आता अभिनेत्री अदा शर्मा त्याचे घर खरेदी करणार असल्याच्या अनेक चर्चा सुरु झाल्या होत्या.पण तिने मात्र कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती. पण आता त्याबद्दल खुद्द अदाने यावर खुलासा केला आहे. (Adah Sharma on sushant singh rajput home)
सुशांतचे निधन १४ जून २०२० साली वांद्रे येथील राहत्या घरी झाले होते. ते घर आता अदा खरेदी करणार अशा चर्चा सुरु झाल्या होत्या. पण त्यावर अदाने सांगितले की, “मला केवळ इतकेच सांगायचे आहे की मी सगळ्यांच्या हृदयात राहते. प्रत्येक गोष्ट बोलण्याची एक ठराविक वेळ असते. जेव्हा मी ती जागा बघण्यासाठी गेले होते तेव्हा मीडियाने मला जे महत्त्व दिले ते पाहून मी अतिशय धन्य झाले होते. मला माझं आयुष्य खासगी ठेवायला आवडतं. मला माझ्या चित्रपटांच्या माध्यमातून लोकांच्या नजरेत राहायला आवडतं. मला माझे आयुष्य खासगी ठेवायला आवडते”.
ती त्या घरात राहणार की नाही हे तिने स्पष्ट सांगितले नाही. पण सुशांतबद्दल तिच्या मनात खूप आदर व प्रेम असल्याचे तिने सांगितले. पुढे ती म्हणाली की, “जी व्यक्ती या जगात नाही त्या व्यक्तीबद्दल काही बोलणे योग्य नाही. त्याने खूप चांगल्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्याचा मी खूप आदर करते. त्याचे जिथे अस्तित्त्व आहे ते मला तसेच ठेवायला आवडेल”.
याबरोबरच अदाने ट्रोलर्सवर देखील निशाणा साधला आहे. ती म्हणाली की, “लोक विनाकारण कमेंट्स करतात ते मला आवडत नाही. मी सुशांतबद्दल काही कमेंट्स वाचल्या. म्हणजे ते लोक मलादेखील ट्रोल करु शकतील. मी नक्की कुठे राहते याबद्दल मी लवकरच सांगेन. पण सध्या मी लोकांच्या हृदयात रहाते तेही कोणत्याही प्रकारचे भाडं न देता”.
अदाच्या कामाबद्दल सांगायचे झाले तर ती ‘द केरला स्टोरी’ या चित्रपटामध्ये दिसून आली होती. या चित्रपटाला प्रेक्षकांची खूप पसंती मिळाली होती. हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यातदेखील अडकला होता.