छोट्या पडद्यावरील ‘तुझ्यात जीव रंगला’ या लोकप्रिय मालिकेतून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे अक्षया देवधर. या मालिकेत तिने अंजली पाठक ही भूमिका साकारत प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केले. या लोकप्रिय मालिकेतून अभिनेता हार्दिक जोशी आणि अभिनेत्री अक्षया देवधर यांची जोडी मराठी मनोरंजन विश्वात प्रचंड लोकप्रिय झाली. अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यावर हे पडद्यावरचे सहकलाकार खऱ्या आयुष्यातही लग्नबंधनात अडकले.
अक्षया-हार्दिक ही जोडी सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. सोशल मीडियावर आपले अनेक फोटो व व्हिडीओ शेअर करत ते चाहत्यांच्या संपर्कात राहतात. त्यांच्या या फोटो व व व्हिडीओला चाहत्यांकडूनही चांगलाच प्रतिसाद मिळताना दिसून येतो. अशातच आज अक्षयाच्या वाढदिवसानिमित्त हार्दिकने बायकोसाठी एक खास पोस्ट शेअर केली आहे. हार्दिकने अक्षयाबरोबरचे क्युट फोटो शेअर करत तिला वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.
हार्दिकने अक्षयासाठी लिहिलेल्या खास पोस्टमध्ये असं म्हटलं आहे की, “प्रिय अक्षया, तू माझ्या आयुष्यातील सर्वात खास व्यक्ती आहेस. तुझ्याशिवाय माझ्या आयुष्यातील एकही दिवस जाण्याची मी कल्पना करू शकत नाही. मला आशा आहे की, येत्या वर्षभरात तू तुझ्यासाठी नवीन आव्हाने स्वीकारत स्वत:ला सिद्ध करुन दाखवशील. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!” तर अक्षयानेही हार्दिकच्या या पोस्टवर “माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे” असं म्हणत उत्तर दिलं आहे.
आणखी वाचा – मेष व कर्क राशीच्या लोकांना नशीब उत्तम साथ देईल, धनलाभाचाही आहे योग; कुणाचं नशीब उजळणार?, जाणून घ्या…
हार्दिकने शेअर केलेल्या या फोटोला हार्दिक व अक्षया यांच्या अनेक चाहत्यांनी लाईक्स व कमेंट्स करत चांगलाच प्रतिसाद दिला आहे. तसेच अनेकांनी या पोस्टखाली अक्षयाला वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. “अंजली बाईंना वाढदिवसाच्या शुभेच्छा, अंजलीबाई आणि राणादा खूपच भारी दिसत आहात, आम्ही तुमची मालिका आणि जोडी खूपच मिस करत आहोत, अक्षया वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, राणादा-पाठकबाई एक नंबर जोडी” अशा अनेक कमेंट्स करत हार्दिकने शेअर केलेल्या या पोस्टला भरभरून प्रतिसाद दिला आहे.