बॉलिवूड अभिनेता रणदीप हूड्डा हा गेले काही दिवस त्याच्या ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ या चित्रपटामुळे चांगलाच चर्चेत आहे. चित्रपटातील सावरकरांच्या भूमिकेने तो सध्या सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. त्याचबरोबर या चित्रपटात अभिनयासह लेखन व दिग्दर्शनही केले आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर आतापर्यंत चांगली कमाई केली असल्याचे पाहायला मिळत आहे. ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ हा चित्रपट पाहिल्यानंतर सामान्य प्रेक्षकांसह मनोरंजन विश्वातील कलाकार मंडळीदेखील या चित्रपटाबद्दल प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत.
शरद पोंक्षे, प्रवीण तरडे, सुबोध भावे, प्रसाद ओक यांसह अनेक कलाकार मंडळींनी ‘स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपटाबद्दल प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. अशातच अभिनेत्री अमृता खानविलकरनेही हा चित्रपट पाहिल्यानंतर तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत. सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर करत तिने या चित्रपटाचे, चित्रपटातील कलाकारांचे कौतुक केले आहे. अमृताने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे चित्रपटाविषयी एक पोस्ट शेअर केली असून ही पोस्ट सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
अमृताने ही पोस्ट शेअर करत असं म्हटलं आहे की, “काल ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ हा चित्रपट मराठीत पाहण्याची संधी मिळाली. या चित्रपटात वीर सावरकरांच्या अदम्य भावनेचे किती मनमोहक चित्रण आहे. रणदीप हुड्डा यांनी अगदी कुशलतेने व प्रभावीपणे ही भूमिका साकारली आहे. तसेच चित्तथरारक छायाचित्रणासह सावरकरांचा प्रवास या चित्रपटातून जिवंत केला आहे. त्याचबरोबर या चित्रपटात असे काही क्षण आहेत जे तुम्हाला वेदना, राग, असहाय्यता पाहायला मिळते.”
यापुढे अमृताने तिची मैत्रीण व अभिनेत्री अंकिता लोखंडेचे कौतुक करत असं म्हटलं आहे की, “यमुनाबाई म्हणून अंकिताने एक अविस्मरणीय कामगिरी करत ती किती सशक्त अभिनेत्री आहे हे तिने दाखवून दिले आहे. काय कमाल काम केले आहेस अंकिता. मला तुझा अभिमान वाटतो आणि सर्वात शेवटी सुबोध भावेच्या आवाजाने मला खरोखरच सावरकरांच्या प्रत्येक शब्दाचे, कृतीचे आणि भावनांचे गांभीर्य अगदी प्रकर्षाने जाणवले.” दरम्यान, अमृताने शेअर केलेल्या या पोस्टला चाहत्यांनीही लाईक्स व कमेंट्सद्वारे चांगलाच प्रतिसाद दिला आहे.