‘झिम्मा २’ हा चित्रपट केव्हा प्रदर्शित होणार याकडे साऱ्यांच्या नजरा लागून राहिल्या आहेत. ‘झिम्मा २’ चित्रपटाच्या टीझरने, चित्रपटातील गाण्याने आणि ट्रेलरने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. ‘मराठी पोरी दाखवतो दुनियेला माज…’ हे गाणं सध्या साऱ्या रसिक प्रेक्षकांना थिरकायला भाग पाडतंय. सर्वसामान्यांपासून ते अगदी कलाकार मंडळींपर्यंत अनेकांना या गाण्यावर थिरकण्याचा मोह आवरला नाही आहे. अनेकांनी या गाण्यावर रील बनवत शेअर देखील केले आहेत. सध्या हे गाणं ट्रेंडिंग वर आलं असल्याचंही पाहायला मिळत आहे. (Hemant Dhome On Jhimma 2)
काही दिवसांपूर्वी या चित्रपटातील मुख्य अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि त्याची पत्नी मिताली मयेकर या दोघांनी या गाण्यावर ठेका धरलेला पाहायला मिळाला. नुकत्याच पार पडलेल्या ‘झिम्मा २’ च्या ट्रेलर लॉंच सोहळ्यामध्येही चित्रपटातील कलाकारांनी या गाण्यावर धुमाकूळ घातला. यानंतर आता ‘झिम्मा २’ चित्रपटाच्या दिग्दर्शकाची पोस्ट विशेष चर्चेत आली आहे. एक आनंदी व भावुक अशी पोस्ट शेअर करत हेमंतने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
हेमंतने ‘मराठी पोरी…’ या गाण्यावर त्याची आई ठेका धरतानाचा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. याखाली त्याने कॅप्शन देत म्हटलं आहे की, “जिच्यावरून प्रेरित ‘झिम्मा’ मधील निर्मला कोंडे-पाटील म्हणजेच निर्मिती सावंत या साकारत असलेल्या हे पात्र आहे ती म्हणजे माझी आई वैशाली ढोमे. कधीही असं रील बनवुन नाचली नाही, पण हे पण तिने करून पाहिलं! आयुष्यात सारंकाही करून बघायची इच्छा कायम जिवंत ठेवणारी, जगण्याचा आनंद लुटणारी माझी आई. मला आणि आमच्या कुटुंबाला कायम हसवणारी आणि माया देणारी माझी आई, माझी निर्मला! लव्ह यु मम्मा. या रीलमध्ये तिला साथ देतेय आमची बहिणाबाई सोनाली ढोमे”.
हेमंतच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट करत त्याच्या आईच कौतुक केलं आहे. तर अनेकांनी सिनेमाबाबत उत्सुकता दर्शविली आहे. येत्या २४ नोव्हेंबरला हा सिनेमा संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार असून प्रेक्षकांना खुर्चीत खिळवून ठेवण्यास सज्ज होत आहे. हेमंत ढोमे दिग्दर्शित या चित्रपटात सिद्धार्थ चांदेकर, अभिनेत्री सुहास जोशी, निर्मिती सावंत, सुचित्रा बांदेकर, क्षिती जोग, सायली संजीव, रिंकू राजगुरु, शिवानी सुर्वे यांच्या महत्वपूर्ण भूमिका पाहणं रंजक ठरणार आहे.