अॅमेझॉन प्राईम व्हिडीओ या ओटीटी माध्यमाची ओरिजिनल वेब सीरीज ‘द फॅमिली मॅन’ने प्रेक्षकांच्या मनात अशी काही छाप सोडली की, लोक या सीरिजच्या आगामी सीझन्सची अगदी आतुरतेने वाट पाहत असतात. आतापर्यंत या सीरिजचे दोन सीझन्स प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत.पहिल्या दोन सीझनच्या जबरदस्त यशानंतर तिसऱ्या सीझनबाबत चाहत्यांची उत्सुकता वाढत चालली आहे. या सीजनमध्ये अनेक नवीन कलाकारांचे चेहरे दिसणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे अनेक चाहत्यांना तिसऱ्या सीझनची प्रतीक्षा लागून आहे. काही दिवसांपूर्वी या सीरिजमध्ये अभिनेता जयदीप अहलावत असणार असल्याचे वृत्त समोर आले होते. त्यामुळे ‘द फॅमिली मॅन’च्या तिसऱ्या सीझनमध्ये मनोज वाजपेयीबरोबर जयदीप अहलावतला पाहण्यासाठी अनेक प्रेक्षक उत्सुक आहेत. (The Family Man 3 new updates)
जयदीप अहलावत हा मनोजच्या विरुद्ध असणार आहे असे वृत्त समोर येत आहे. जयदीप अहलावत ‘द फॅमिली मॅन सीझन ३’ मध्ये सामील होणार असल्याची बातमी आल्यापासून चाहत्यांना त्याच्या पात्राबद्दलच्या प्रत्येक तपशीलाबद्दल उत्सुकता आहे. अशातच एका सूत्राकडून अशी माहिती समोर येत आहे की, जयदीप अहलावतचे पात्र मनोज वाजपेयीला टक्कर देणार आहे. ‘द फॅमिली मॅन’च्या सीझन ३’ मध्ये जयदीप अहलावतची भूमिका खूप महत्त्वाची असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे आता या दोघांना एकमेकांच्या विरोधात उभे राहिलेले पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.
या सिरिजमध्ये जयदीप अहलावतच्या आगमनानंतर, मनोज वाजपेयींच्या ‘फॅमिली मॅन’ या सीरिजबद्दल लोकांची उत्कंठा वाढणार आहे, कारण जयदीप अहलावत एक उत्कृष्ट अभिनेता आहे. जयदीप अहलावतने याआधी ‘आक्रोश’, ‘खट्टा मीठा’, ‘गँग्स ऑफ वासेपूर’, ‘रईस’, ‘राझी’, ‘लस्ट स्टोरीज’ आणि ‘बागी ३’ यांसारख्या चित्रपटांमध्ये महत्त्वपूर्ण अभिनय केला आहे.
दरम्यान, चाहत्यांना लवकरच प्रदर्शित होणाऱ्या तिसऱ्या सीझनची प्रतीक्षा आहे. ‘द फॅमिली मॅन’च्या दोन्ही सीझनमध्ये मनोज वाजपेयीचा अप्रतिम अभिनय पाहायला मिळाला, पण आता जयदीप अहलावतचा जबरदस्त अभिनय पाहण्यासाठी प्रेक्षक ‘द फॅमिली मॅन ३’ या सीरिजची आतुरतेने वाट पाहत आहेत.