Tharla Tar Mag Serial Update : ‘ठरलं तर मग’ ही मालिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस पडत आहे. या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात घर केलं. मालिकेत सायली-अर्जुनच्या जोडीला तर प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर उचलून धरलं. मालिकेत सायली-अर्जुन एकत्र दाखवत असले तरी दोघांनी अद्याप एकमेकांसमोर प्रेमाची कबुली काही दिलेली नाही. तर एकीकडे अर्जुनने सायलीचं मन जिंकलं आहे. अर्जुनने मधुभाऊंची सुटका करुन सायलीचं मन जिंकलं आहे. यानंतर मालिकेत अर्जुन व सायली एकत्र येतील, प्रेमही कबुली देतील अशी अपेक्षा अनेकांना होती. अशातच मालिकेच्या महाएपिसोडचा एक प्रोमो समोर आला आहे. या प्रोमोमध्ये अर्जुन सायलीसमोर प्रेमाची कबुली देणार असल्याचं दिसत आहे.
असं असलं तरी समोर आलेल्या नव्या प्रोमोने प्रेक्षकांचा हिरमोड केला आहे. स्टार प्रवाहच्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवरदेखील हा नवा प्रोमो शेअर करण्यात आला आहे. ज्यामध्ये अर्जुन हातात फुलांचा गुच्छ घेऊन सायली समोर प्रेम व्यक्त करण्यासाठी प्रॅक्टिस करताना दिसतोय. याचवेळी प्रिया एका झाडामागे लपून अर्जुनच बोलणं ऐकताना दिसत आहे. अर्जुन म्हणतो की, “मिसेस सायली मला तुम्हाला माझ्या मनातलं पहिल्यांदाच सांगायचं आहे”.
तेव्हा प्रिया मनातल्या मनात म्हणते, “मला माहितीये तुझं सायलीवर खरं प्रेम नाहीये.” पण, तितक्यात अर्जुन म्हणतो, “आय लव्ह यू मिसेस सायली”. हे ऐकून प्रियाच्या पायाखालची जमीनचं सरकते. मात्र मालिकेत आलेला हा ट्विस्ट काही प्रेक्षकांना आवडला नाही आहे. अनेकांनी कमेंट करत मालिकेच्या कथानकावर नाराजी व्यक्त केली आहे. “नवीन काय यात, प्रिया हेच तर करते”, “फालतू काहीतरी दाखवू नका”, असं म्हणत नाराजी व्यक्त केली आहे.
तर काही प्रेक्षकांनी, “अर्जुन-सायलीमध्ये गैरसमज दाखवू नका”, “आता खूप बोअर होतेय सीरियल”, “कृपया आता ताणू नका, अति होतं आहे”, “आता काय गरज होती प्रियाला मध्ये आणायची. नुसती फालतुगिरी चालवली आहे”, “नुसता टाईमपास”, “मालिका कोणी बघू नका, टीआरपी घसरला की बरोबर ठिकाण्यावर येतील”, अशा अनेक कमेंट करत मालिकेला ट्रोल केलं आहे.