tharala tar mag news : ‘ठरलं तर मग’ ही मालिका गेली अनेक वर्ष रसिकांच्या मनात घर करुन आहे. या मालिकेच्या कलाकारांनी ही मालिका अव्वल स्थानावर नेऊन ठेवली. सायली व अर्जुनच्या जोडीला तर प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर उचलून धरलं. सायली ही भूमिका मालिकेत अभिनेत्री जुई गडकरी साकारत आहे. जुईला या मालिकेने विशेष प्रेम आणि लोकप्रियता मिळवून दिली. अनेक मालिकांमध्ये जुईने यापूर्वी महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. जुई नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते. नेहमीच ती काही ना काही शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. अशातच आता जुईने रक्षाबंधन स्पेशल एक व्हिडीओ शेअर केला आहे. आणि जुईने शेअर केलेला हा व्हिडीओ ‘ठरलं तर मग’च्या सेटवरचा आहे.
मालिकांमध्येही अनेकदा सणवार साजरे केलेले पाहायला मिळतात. अशातच ‘ठरलं तर मग’च्या मालिकेच्या सेटवरही नुकतंच रक्षाबंधन साजरं झालं आहे. मालिकेतील सायलीला म्हणेजच जुई गडकरीला सेटवरील एका खास व्यक्तीने राखी बांधत हा खास क्षण साजरा केला. जुईचे मालिकेतील कलाकारांबरोबरच इतर टीमशीही चांगले बॉण्डिंग असलेलं पाहायला मिळतं. तिच्या या उत्तम बॉण्डिंगचा एक व्हिडीओ अभिनेत्रीने इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे.
जुई गडकरीला रक्षाबंधननिमित्त तिची हेअरड्रेसर काजलने राखी बांधली आहे. जुईने याबाबत पोस्ट शेअर करत म्हटलं, “ती आली आणि मला म्हणाली माझं असंच कायम रक्षण करा. आम्ही एकत्र रडतो, एकत्र हसतो, एकत्र भांडतो, एकत्र मजा करतो, एकत्र काम करतो. एकंदर काय तर हेच आमचं प्रेम आहे. काजल आमची हेअरड्रेसर आहे. प्रिय, काजल काळजी करु नकोस मी सदैव तुझं रक्षण करेन”. जुईच्या या व्हिडीओमध्ये काजल आणि तिचं खास बॉण्ड पाहायला मिळत आहे.
जुईने शेअर केलेल्या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. इतकंच नाहीतर जुईच्या मनमेळाऊ स्वभावाचं कौतुक केलं आहे. “तुमच्यातील हे बॉण्डिंग पाहून खरंच खूप छान वाटलं”, “फार कमी असे कलाकार असतात”, असं म्हणत जुईचं तोंडभरुन कौतुक केलं आहे.





