स्टार प्रवाह वाहिनीवरील ठरलं तर मग ही मालिका प्रेक्षकांच्या आवडीची मालिका आहे. मालिकेतील रंजक वळण आणि अर्जुन-सायली यांची केमिस्ट्रीमुळे ही मालिका अनेक दिवस टीआरपीच्या शर्यतीत अव्वल स्थानी आहे. सायली आणि अर्जुनमध्ये झालेल्या गैरसमजामुळे त्यांच्या नातं पुन्हा एका वेगळ्याच वळणावर आलं आहे. अर्जुन मधूभाऊंची केस लांबणीवर टाकणार असल्याचा गैरसमज सायलीचा झाला आहे. त्यामुळे तिच्या आणि अर्जुनच्या नात्यामध्ये गैरसमज निर्माण झाला आहे. पण आता दिवाळीत त्यांच्यातीळ हे सगळे गैरसमज संपणार आहेत. दिवाळीच्या दिवशी अर्जुन सायलीला खास भेट देऊन तिचे सगळे गैरसमज दूर करणार आहे. (Tharala Tar Mag Serial Update)
‘ठरलं तर मग’ या मालिकेचा एक नवीन प्रोमो नुकताच शेअर करण्यात आला आहे आणि या प्रोमोमधून अर्जुनने मधुभाऊंची सुटका केल्याचे पाहायला मिळत आहे. तुळशीसमोर दिवा लावताना मधुभाऊ आपल्या लेकीला आवाज देतात. आपल्या वडिलांना सणाच्या दिवशी घरी परत आलेलं पाहून सायलीला प्रचंड आनंद होतो. ती धावत जाऊन मधुभाऊंना मिठी मारते आणि मधुभाऊंना पाहून सायलीला अश्रु अनावर होतात. त्यामुळे आता सायली आणि अर्जुन यांच्या नात्यामध्ये गैरसमज दूर होणार असल्याचं पाहायला मिळत आहे.
मालिकेच्या या नवीन प्रोमोमध्ये सायली अर्जुनला म्हणते की, “तुम्ही मधूभाऊंची केस मुद्दाम लांबणीवर टाकत होतात? तुमच्यामुळे मी मधूभाऊंना परत कधीच भेटू शकणार नाहीये. चांगली भेट दिलीत मला दिवाळीची. मला वाटलं नव्हतं तुम्ही इतके वाईट असाल”. त्यानंतर अर्जुन दिवाळीच्या दिवशी मधुभाऊंनाच घेऊन घरी येतो. त्यावेळी मधूभाऊ म्हणतात की, “जावईबापूंनी बेलवर सोडवून आणलं आहे मला”. त्यावेळी अर्जुन सायलीला म्हणतो की, “तुम्हाला वाटतो इतकाही मी वाईट नाही” आणि सायली अर्जुनला घट्ट मिठी मारते.
दरम्यान, मालिकेचा हा नवीन ट्विस्ट सर्वांनाच आवडला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून चाहते मंडळी या क्षणाची वाट पाहत होते आणि अखेर हा क्षण आला आहे. त्यामुळे आता सायली-अर्जुन यांच्या प्रेमाला नवा बहर येणार का याचीही उत्सुकता प्रेक्षकांना लागून राहिली आहे. अर्थात अनेकांनी हे स्वप्न नको असूदे अशाही प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.