‘बिग बॉस मराठी’चे पाचवे पर्व संपले असले तरी या शोची आणि शोमधील स्पर्धकांची चर्चा काही कमी झालेली नाही. ‘बिग बॉस मराठी’चे पाचवे पर्व संपल्यानंतर घरातील सर्वच स्पर्धक एकमेकांच्या भेटी घेत आहेत. गेल्या काही दिवसांत इरीना व वैभव ही डीपी यांच्या गावी गेल्याचे पाहायला मिळाले. तसंच डीपी, वैभव, इरीना ही तिघे सूरजच्या गावी गेले होते. नुकतंच अंकितानेही सूरजच्या गावी जात त्याची भेट घेतली. असं असतानाच छोटा पुढारी म्हणजे घन:श्याम दरवडेने मुंबईत येऊन निक्की व अरबाज यांची भेट घेतली आहे. या खास भेटीचा व्हिडीओ त्याने सोशल मीडियावर शेअर केला आहे. (Ghanshyam Darwade Nikki Tamboli and Arbaaz Patel Meet)
या व्हिडीओमध्ये अरबाजने कॅमेरा पकडला असून यामध्ये निक्की व घन:श्यामही आहेत. तर अरबाज या व्हिडीओमध्येयसा म्हणतो की, “घन:श्याम मुंबईत व्लॉग बनवण्यासाठी आला होता”. इतक्यात घन:श्याम “असं काहीही नाही” असं म्हणतो. त्यानंतर निक्कीही घन:श्याम आम्हाला भेटण्यासाठी आला होता” असं म्हणते. पुढे ती असं म्हणते की, “तुझ्या वाढदिवसाला डिसेंबर महिन्यात आम्ही तुझ्या गावी येणार आहोत, तुझा वाढदिवस साजरा करायला आणि तुझ्या सर्व कुटुंबियांनाही अमाही भेटणार आहोत”.
पुढे आनंदाच्या भरात घन:श्याम म्हणाला की, “२५ डिसेंबरला हे दोघं येणार आहेत. निक्की ताई बोलली मग विषय संपला”. पुढे घन:श्याम अरबाज दाजी म्हणता म्हणता भाई म्हणतो आणि घन:श्यामची ही चूक निक्की अचूक हेरते आणि म्हणते “बाई काय म्हणतोय दाजी…” यावर घन:श्याम म्हणतो, “नाही दाजी नाही भाई… दाजी करायचा विचार नक्कीच चालू आहे” आणि यावर निक्कीसुद्धा हो असं उत्तर देते. त्यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
आणखी वाचा – सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा लग्नबंधनात, साधेपणाने केला विवाह, व्हिडीओ व फोटो व्हायरल
दरम्यान, “माझी निक्कू ताई आणि अरबाजची भेट” असं कॅप्शन देत घन:श्यामने हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडीओला तिघांच्याही चाहत्यांनी लाईक्स व कमेंट्स करत चांगलाच प्रतिसाद दिला आहे. “किती छान”, “खूप सुंदर”, “बाई काय हा प्रकार”, “मस्त” अशा अनेक कमेंट्स करत नेटकऱ्यांनी या व्हिडीओला प्रतिसाद दिला आहे. निक्की, अरबाज आणि घन:श्याम हे बिग बॉसच्या घराबाहेरही एकत्र असल्याचे पाहून नेटकऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे.
‘बिग बॉस मराठी’च्या घरात पहिल्या दिवसापासून दोन गट पडल्याचे पाहायला मिळाले. यापैकी एका गटात निक्की, अरबाज, वैभव, जान्हवी आणि घन:श्याम एकत्र खेळत होते. कालांतराने या ‘टीम ए’मध्ये फूट पडली आणि यांची जान्हवी व वैभव यांनी हा ग्रुप सोडला. पण निक्की, अरबाज आणि घन:श्याम यानी आपली मैत्री राखली. त्यामुळे आता या मैत्रीखातर निक्की-अरबाज छोटा पुढारीच्या वाढदिवसाला जाणार का? याची चाहते मंडळी वाट पाहत आहेत.