Jui Gadkari Post After Jyoti Chandekar Demise : ‘ठरलं तर मग’ फेम पूर्णा आजी म्हणेजच अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचं वयाच्या ६९व्या वर्षी निधन झालं. १६ ऑगस्ट रोजी त्यांचे चारच्या सुमारास अकस्मात निधन झाले. ज्योती यांच्या निधनाच्या बातमीने सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. त्यांचे हे असे अचानक जाणे सहकलाकारांसह त्यांच्या चाहत्यांनाही पटले नाही. ज्योती यांची सहकलाकार अभिनेत्री जुई गडकरीही त्यांच्या अंत्यसंस्कारादरम्यान उपस्थित होती. मालिकेत पूर्णा आजी आणि सायली असा त्यांचा घट्ट बॉण्ड पाहायला मिळाला. जुई गडकरीही ज्योती यांच्या अंत्यसंस्काराला ढसाढसा रडताना दिसली. इंस्टाग्राम स्टोरीवर पूर्णा आजीबरोबरचा फोटो शेअर करत, “तुझं असं जाणं मी स्वीकारू शकत नाही, आजी तू फसवलंस”, असं कॅप्शन देत ती भावुक झाल्याचे दिसले.
यानंतर जुईने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत तिच्या लाडक्या ‘म्हातारी’विषयी लिहीत भावुक पोस्ट केली. जुईने फेसबुक पोस्ट शेअर करत असं म्हटलं की, “तशी तिची आणि माझी पहिली भेट २०१० साली ‘बाजीराव मस्तानी’ या मालिकेच्या सेटवर झाली. आम्ही एकाच मेकअप रुममध्ये बसायचो. तिची काम करण्याची पद्धत बघून मी हुरळुन गेले होते. आळवणातही कोण इतकं सुंदर कसं दिसू शकतं, असा प्रश्न पडायचा. मग २०२२ साली ‘ठरलं तर मग’ला पुन्हा आम्ही भेटलो. आधी अहो ज्योती ताई, मग अगं ज्योती ताई, मग पूर्णा आजी, मग फक्त आजी आणि नंतर माझी म्हातारी, अशी आमची मैत्री वाढली होती. म्हातारीला सगळ्याची आवड! माझ्या वयाच्या मुलींनाही लाजवेल अशी छान नट्टापट्टा करायची, छान साड्या, दागिने खास स्वतःचे, नवनवीन कॉस्मेटिक्स, जेल पॅालीश इ. अशा सगळ्याची तिला खूप आवड. मला मुळात आजी आजोबा खूप आवडतात. माझी आजी २०१५ साली गेली, पण त्यानंतर मला माझ्या म्हातारीत माझी आजी पुन्हा भेटली, तशीच गोड गुबगुबीत. तिच्या स्पर्शाची एक वेगळी ऊब होती आणि म्हणुन मी सतत तिच्या अंगाअंगाशी करायचे. तिच्या मांडीत बसायचे, अंगावर रेलुन झोपायचे, तिचे हात धरायचे, तिला लाडाने माझी नखं लावायचे. त्यावर ती प्रेमाने मला ‘आलं माझं मांजराचं पिल्लु’ असं म्हणायची”.
“४-४.३० झाले की तिचा खाऊचा पिटारा उघडायची. त्यात काय काय असेल ते सगळ्यांना द्यायची. बरेचदा त्यात चिप्स, चकल्या, शेव इ. असायचं. त्यावरुन माझा रोज ओरडा खायची. गोड माझ्यापासुन लपवून खायची आणि पकडलीच जायची. कित्येकदा मी तिच्या तोंडातून भजी, गुलाबजाम बाहेर काढलेत, पण म्हातारी ऐकायची नाहीच. पुण्यावरुन येताना आवर्जुन सगळ्यांसाठी क्रीमरोल आणायचीस. एकदा मी तिला जरा जास्त ओरडले. जे जे करायचं नाही, तेच करतेस असं खुप बोलले. त्यावर मला म्हणाली ‘मला पंडितांकडे जायचंय’ आणि मी सुन्न पडले. त्यापुढे मी ना तिला ओरडु शकले ना काही बोलू शकले. कोणाच्या आयुष्यात कसा कुठल्या बाबतीत एकटेपणा असू शकेल काही सांगता येत नाही”.
“जेवायला आवर्जुन माझ्या शेजारी बसायची. मग माझ्या डब्यातलं काय असेल ते आवडीने खायची. ‘जुया फदफदं आण ना’, असं म्हणाली होती आणि मी ते करुन नेल्यावर खास खुश झाली होती. तिच्या घरातल्या तिच्या केअरटेकर मावशी तिला रोज डबा द्यायच्या. बरं, त्या हिच्यापेक्षा बऱ्याच तरुण, तरी त्यांना ही म्हातारी म्हणायची. माझ्याकडचं पेन रीलीफ ऑईल बरेचदा विकत घ्यायची. पाय सतत सुजलेले असायचे तिचे. हट्टी होती, कधी सेटवर कोणी ओरडलंच तर रडायचीही अगदी लहान मुलासारखी. पण माझी म्हातारी काम काय सुंदर करायची. डायलॉगचं प्रॉम्पटिंग घेतलं तरी त्यात जान भरुन ते डिलीव्हर करायची. कधी करारी, तर कधी प्रेमळ असे पटकन तिचे डोळे बदलायचे. तिच्याबरोबर मी खूप सीन केले ज्यात आमचं पर्सनल नातं तयार झालं. तिच्यात मला माझी आजी दिसायची. तिचे पाय चेपून देण्याचे सीन, तिला भरवण्याचे सीन मी मनापासुन एन्जॅाय करायचे. माझा पहिला ॲानस्क्रीन पापी घेण्याचा सीन मी तिच्या बरोबरच केला आणि मग तिच्या सतत पाप्या घेणं, तिला मीठी मारणं हे सीनमध्ये आपसुक व्हायचे. तिच्याबरोबरचे सीन करायला कधी ग्लिसरीन नाही घ्यावं लागलं”.
“मी तिची खुप चेष्टा करायचे, पण तिचा मोठेपणा की तिने ते मनाला कधीच लावून घेतलं नाही. मला तिच्या काठीने फटके द्यायची, पण रागावली कधीच नाही. बरेचदा आजारी असायची. त्यावर आम्ही तिला म्हणायचो असं म्हण मी बरीए. मग बरी होशील. बरेचदा सेटवरुन हॅास्पिटलला नेलं तिला, पण ती परत यायची, परत सुंदर दिसायची, मस्ती करायची. याही वेळेला वाटलं होतं तू परत येशील. पुढच्या १० दिवसात आपण ९०० भाग पूर्ण करतोय गं. अजुन कितीतरी काम करायचं बाकी होतं. तुझ्याकडुन अजुन खूप शिकायचं होतं. तुझ्या व्यतिरीक्त ‘पूर्णा आजी’ म्हणून दुसऱ्या कोणाला मी कशी एक्सेप्ट करु?”
“तुझी औषधाच्या वासांनी भरलेली खोली, तुझा रेलीस्प्रेचा परफ्युम. हे सगळं आता परत कधीच दिसणार नाही. आजही तुझ्या दागिन्यांनी भरलेले तुझ्या रुमचे ड्रॉव्हर तसेच लॅाक आहेत आणि कदाचित तसेच राहतील. तुला माझं लग्नं झालेलं बघायचं होतं. मला म्हणायचीस मी ठणठणीत बरी होऊन येणार तुझ्या लग्नाला. सगळं राहुन गेलं गं. आपल्या मोनिकाच्या वृंदाला तुझा सहवास लाभला, आशीर्वाद मिळाला हीच मोठी गोष्ट. अगदी परवा म्हणालीस ना गं मी येते पुण्याला जाऊन. आज तिला स्मशानात असं शांत झोपलेलं बघून खूप त्रास झाला. एका क्षणात सगळं शांत झालं होतं. कधी कधी रक्ताची नसली तरी अशी नाती असतात जी खूप आनंदही देतात आणि त्रासही. आजी तुझी ऊणीव कायम भासत राहील. तू परत येते सांगून परत आलीच नाहीस. आता तरी पंडिंतांबरोबर शांत, सुखी राहा. ॥ॐ शांती॥”.





