jyoti chandekar passed away : ‘ठरलं तर मग’ मालिकेत पूर्णा आजीची भूमिका साकारुन प्रेक्षकांच्या मनात घर करणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचे निधन झालं आहे. वयाच्या ६९ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. प्रकृती बिघडल्याने गेल्या तीन-चार दिवसांपासून त्या पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचार घेत होत्या. मात्र आज दुपारी चारच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. निधनाच नेमकं कारण सध्या समोर आलेलं नाहीये. त्यांच्या अचानक निधनाच्या समोर आलेल्या बातमीने सिनेसृष्टीवर शोककळा पसरली. गेल्या वर्षीही ज्योती चांदेकर यांनी आजारपणाशी मोठा लढा दिल्याचं पाहायला मिळालं.
‘ठरलं तर मग’ मालिकेच्या सेटवरच पूर्णा आजी बेशुद्ध होऊन पडल्या होत्या. त्यानंतर त्यांनी या आजारपणावर मात करत पुन्हा मालिकेत कमबॅक केल्याचं पाहायला मिळालं. मंगळागौरीच्या शूटिंग दरम्यान खुर्चीत बसायला जातानाच त्या बेशुद्ध झाल्या. सोडियम कमी झाल्याचे कारण समोर आलं आणि त्यावेळेला सेट वरील सगळ्यांचीच तारांबळ उडालेली पाहायला मिळाली. त्यानंतर लगेचच त्यांना हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. हॉस्पिटलमधील उपचारानंतर बरी होऊन घरी आल्यानंतर त्यांनी दोन महिने मालिकेतून ब्रेक घेतला आणि आराम केल्यानंतर त्या पुन्हा एकदा शूटिंगवर परतल्या.
आणखी वाचा – ‘ठरलं तर मग’ फेम पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांच्या निधनाने कलाविश्वावर शोककळा
यादरम्यान, पूर्णा आजी मालिकेत दिसत नसल्यामुळे अनेक प्रेक्षक मंडळी मालिकेत पूर्णा आजीच्या एण्ट्रीची वाट पाहत होते. त्यावेळी मालिकेत पूर्णा आजी देवदर्शनानिमित्त बाहेर गेल्याचं दाखवण्यात आलं होतं. पण, प्रत्यक्षात प्रकृतीच्या कारणास्तव त्यांनी काही दिवस मालिकेतून ब्रेक घेतल्याचं त्यांची मुलगी व लोकप्रिय अभिनेत्री तेजस्विनी पंडितने इन्स्टाग्राम पोस्टद्वारे सांगितलं होतं. अखेर आजारपणातून ठणठणीत बऱ्या होऊन पूर्णा आजी पुन्हा एकदा मालिकेमध्ये परतल्या.
आणखी वाचा – “तू फसवलंस…”, पूर्णा आजीच्या निधनाने सायलीला धक्का, तर अर्जुनलाही अश्रू अनावर, म्हणाला, “आमच्यात नाहीस…”
ज्योती चांदेकर यांनी वयाच्या १२व्या वर्षापासून अभिनय क्षेत्रात काम करायला सुरुवात केली होती. २०० हून अधिक पुरस्कार त्यांनी नावावर केले होते. आईच्याच पावलावर पाऊल ठेवत तेजस्विनी पंडित हिनेदेखील अभिनयात करिअर करायचं ठरवलं. ज्योती चांदेकर यांच्या पार्थिवावर उद्या सकाळी ११ वाजता पुण्यातील वैकुंठ स्मशानगृहात अंत्यसंस्कार पार पडणार आहेत.





