‘ठरलं तर मग’ या मालिकेला सध्या प्रेक्षकांची विशेष पसंती मिळताना दिसत आहे. मालिका सध्या टीआरपीच्या शर्यतीतही अव्वल स्थानावर आली आहे. मालिकेत एकामागोमाग एक रंजक वळण येताना पाहायला मिळत आहेत. आश्रमाच्या केसबाबत अर्जुन पुरावे शोधण्यासाठी धडपड करत आहे. अर्जुन व सायली सापळा रचून प्रियाला अडकवण्याचा प्रयत्न करतात. मात्र वेळीच चैतन्य धावत येत प्रियाची अर्जुनच्या तावडीतून सुटका करतो. प्रियाला अडकवण्यात अर्जुन-सायलीचा डाव फसतो. (Tharal Tar Mag New Entry)
यानंतर आता मालिकेचा नवा प्रोमो समोर आला आहे. समोर आलेल्या प्रोमोमध्ये मालिकेत गुढीपाडवा साजरा करण्यात आलेला दिसतोय. गुढीपाडव्यानिमित्त सुभेदार कुटुंबाची लगबग सुरु असते. सगळीच मंडळी गुढी उभारण्यासाठी जमलेली असतात. यावेळी कलाकारांचा पारंपरिक अंदाज पाहायला मिळत आहे. गुढी उभारत असतानाच मध्येच अर्जुन सर्वाना थांबायला लावतो.
गुढीची पूजा करताना अर्जुन कुटुंबीयांना काही वेळ वाट बघा कोणीतरी येतंय, असं म्हणतो. सगळ्यांना कळत नाही की नेमकं कोण येणार आहे. अशातच गाडीतून उतरून एक नवीन पाहुणी सुभेदारांच्या घराच्या दिशेने चालत येते. ही पाहुणी दुसरी तिसरी कोणीही नसून ‘बिग बॉस’ फेम अभिनेत्री रुचिरा जाधव आहे. मालिकेत नव्या पात्राची एंट्री झालेली पाहायला मिळत आहे. रुचिरा अद्याप मालिकेत कोणत्या भूमिकेत दिसणार हे समोर आलेलं नाही. रुचिराने आजवर अनेक मालिकांमध्ये भूमिका साकारत प्रेक्षकांमध्ये छाप पाडली आहे. मात्र ‘बिग बॉस’मराठीमुळे रुचिराला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली.
समोर आलेल्या प्रोमोमध्ये असं पाहायला मिळत आहे की, रुचिरा गाडीतून उतरून चालत घरच्या दिशेने येते. तिला पाहून अर्जुन धावत तिच्याजवळ जातो आणि तिला घट्ट मिठी मारतो. हे पाहून सायलीच्या चेहऱ्यावरचा रंग उडतो. आता रुचिराच्या एन्ट्रीने अर्जुन-सायलीच्या नात्यावर काही परिणाम होणार का?, हे पाहणं मालिकेच्या येणाऱ्या भागात रंजक ठरेल.