काही चित्रपट असे असतात, ज्याचं नाव आपण घेतलं, तर आपल्या डोळ्यासमोर पूर्ण चित्रपट उभा राहतो. ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’ हा चित्रपट सर्वांच्या लक्षात राहणारा चित्रपट आहे. झोया अख्तर दिग्दर्शित हा चित्रपट २०११ मध्ये प्रदर्शित झाला होता. ज्यामध्ये हृतिक रोशन, फरहान अख्तर, अभय देओल, कतरिना कैफ आणि कल्की कोचलीन अशी तगडी स्टारकास्ट होती. तीन मित्रांची बॅचलर ट्रीप, त्या ट्रीपमधील मजा-मस्ती हे प्रेक्षकांना प्रचंड आवडलं होतं. इतकंच नव्हे, तर चित्रपटातील गाणी आजही अनेकदा ऐकली जातात. (Farhan Akhtar on Zindagi Na Milegi Dobara sequel)
अशातच, चाहते या चित्रपटाच्या सिक्वेलची चर्चा होत असताना फरहान अख्तरच्या एका पोस्टने सर्वांचे लक्ष वेधलं आहे. फरहानने इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला. ज्यामध्ये तो चित्रपटातील इम्रानच्या लूकमध्ये दिसतो. हा फोटो शेअर करताना तो म्हणाला, “माझा इम्रान लूक तयार झाला आहे. आम्ही मुलं आणखी एका ट्रीपला जाऊ शकतो का?” असं म्हणत त्याने दिग्दर्शिका झोया अख्तरला प्रश्न विचारला आहे. त्यावर उत्तर देताना ती म्हणाली, “माझी बॅग पॅक केली.” अभिनेता हृतिक रोशनने त्याच्या पोस्टवर कमेंट करत म्हणाला, “आम्ही तयार आहोत. चला जाऊया”. तर अभय देओल यावर म्हणाला, “मी २०१२ पासून माझी बॅग पॅक केली आहे. तुम्ही कुठे थांबले आहेत?”.
हे देखील वाचा – “हा पुरस्कार तुमचा”, राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर सलील कुलकर्णींचा आनंद गगनात मावेना, आईही होती बरोबर, म्हणाले, “ज्यांच्यामुळे प्रत्येक…”
दरम्यान, फरहानचा हा फोटो व्हायरल होताच चाहतेही यावर कमेंट करताना दिसत आहे. एका नेटकऱ्याने कमेंट करत म्हटलं आहे, “खरंच चित्रपटाचा सिक्वेल येणार का? प्लीज माझ्या भावना दुखावतील असा विनोद करू नका.” २०२१ मध्ये फरहानने आलिया भट्ट, कतरिना कैफ व प्रियांका चोप्राला घेऊन ‘जी ले जरा’ या चित्रपटाची घोषणा केली होती. त्याची आठवण करून देताना एक चाहती म्हणाली, “आता आम्हाला मुलींची रोड ट्रीप पाहायची आहे.” एकूणच, अभिनेत्याच्या या पोस्टची सध्या जोरदार चर्चा होत आहे. सध्या फरहान या चित्रपटाव्यतिरिक्त ‘डॉन ३’ चित्रपटात व्यग्र आहे.