‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘ठरलं तर मग’ मालिकेला प्रेक्षकांनी भरभरुन प्रतिसाद दिला. टीआरपीच्या शर्यतीतही ही मालिका अव्वल स्थानावर असलेली पाहायला मिळत आहे. मालिकेत सायली व अर्जुनच्या जोडीला तर प्रेक्षक खूप प्रेम करत आहेत. सायली ही भूमिका मालिकेत अभिनेत्री जुई गडकरी साकारताना दिसत आहे. ‘ठरलं तर मग’ मालिकेतील सायली या पत्रामुळे जुईला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळत आहे. याशिवाय याआधीही जुईने अनेक मालिकांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका करत प्रेक्षकांची मन जिंकली आहेत. (Jui Gadkari Post)
सोशल मीडियावरही जुई बऱ्यापैकी सक्रिय असते. नेहमीच ती काही ना काही शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. अशातच जुईने सध्या घडणाऱ्या घटनेवर भाष्य करणारी एक पोस्ट शेअर केली आहे. पावसाळा आला असून मुंबईकरांना रस्त्यांच्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. पावसाळ्यात रस्त्यावरील खड्डे वा निसरडे रस्ते हे अपघातांना खतपाणी घालण्यास सज्ज झाले आहेत. अशातच या अपघातापासून स्वतःचा बचाव करण्यास व गाडी चालवताना काळजी घेण्यास सांगणारी एक पोस्ट जुईने शेअर केली आहे.
जुईने शेअर केलेल्या या पोस्टमध्ये, “अगदी काल-परवापर्यंत माझ्यावर दोन मोठे खड्डे होते ते बरच होतं ना. मला वर्षानुवर्ष त्यासाठी तुम्ही शिव्या द्यायचा पण निदान त्यामुळे ट्रॅफिक होऊन तुमच्या वाहनांचा वेग तरी कमी व्हायचा. घरी उशिरा जात असाल पण सुखरुप पोहचत होता. मी तरी किती काळ तुमची काळजी घ्यायची?, माझी वाट बघणारं घरी कोणी नाही पण तुमची वाट बघणारे आहेत. काळजी घ्या आणि आपली वाहने सावकाश चालवा. पावसाळा येत आहे पहिल्या पावसात गाड्या नक्कीच स्किड होतात. तर स्वतःची आणि इतरांची पण काळजी घ्या. तुमचाच (लाडका) रस्ता”, असं लिहिण्यात आलं आहे.
यापुढे जुईने समस्त नागरिकांसह एक अनुभव शेअर करत आवाहन केलं आहे. “गेले काही दिवस वेगवेगळ्या ठिकाणी झालेले अपघात बघुन डोकं सुन्नं झालं आहे. त्यात आमच्या सेटवरचा एक असिस्टंट डायरेक्टरपण आहे. तो गेले ७-८ दिवस कोमात आहे. प्लिज गाड्या हळु चालवा”, हे उदाहरण देत तिने नागरिकांना गाड्या हळू चालवण्याचे आवाहन केलं आहे.