‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘ठरलं तर मग’ या मालिकेला प्रेक्षक भरभरुन प्रतिसाद देताना दिसत आहेत. टीआरपीच्या शर्यतीतही ही मालिका अव्वल स्थानावर असलेली पाहायला मिळत आहे. या मालिकेतील कलाकारांवरही प्रेक्षक प्रेम करताना दिसत आहेत. या मालिकेतील सायली अर्जुनच्या जोडीला तर प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर उचलून धरलं आहे. या मालिकेतील सायली या पात्रामुळे अभिनेत्री जुई गडकरी घराघरांत पोहोचली. या मालिकेमुळे जुईला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. जुईचा खूप मोठा चाहतावर्ग आहे. (Jui Gadkari Health Update)
मालिकाविश्वातील लोकप्रिय चेहऱ्यापैकी एक असलेल्या जुईला बरीच लोकप्रियता मिळाली. सोशल मीडियावरही जुई बऱ्यापैकी सक्रिय असते. नेहमीच ती काही ना काही शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. ती इन्स्टाग्रामवर सेशन आयोजित करुन चाहत्यांशी गप्पा मारत असते. अशातच अभिनेत्रीने ‘क्वीक चॅट, लेट्स डू इट’ असं म्हणत चाहत्यांसह संवाद साधला. यावेळी जुईने चाहत्यांच्या अनेक प्रश्नांची उत्तरे दिली.

या संवादात एका चाहत्याने जुईला विचारले की, “दीदी तू आजारी आहेस का, ‘ठरलं तर मग’मध्ये आवाज वेगळा येतो आहे”. चाहत्यांच्या या प्रश्नावर जुईने उत्तर देत असे म्हटले आहे की, “हो, घसा खूप खराब झाला आहे आणि थोडासा तापही आहे. जवळपास महिना झाला असेल”. याशिवाय आणखी एका चाहत्याने विचारलं की, “तुमची तब्येत बरी झाली का?”. यावर अभिनेत्रीने उत्तर देत म्हटलं की, “अजून तब्येतीत सुधारणा होत आहे, मध्येच मी म्युट मोडमध्ये जात आहे”.
जुईवर चाहते भरभरुन प्रेम करतात. शांत, सौम्य, मनमिळावू असा जुईचा स्वभाव चाहत्यांना फार आवडतो. जुईदेखील रील व्हिडीओ करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. सध्या मालिकेत जुई म्हणजेच सायली व अर्जुनचा रोमँटिक अंदाज पाहायला मिळत आहे. मात्र अर्जुनची जुनी मैत्रीण आल्याने मालिकेत काही ट्विस्ट येणार का याकडे साऱ्यांच्या नजरा वळल्या आहेत.