‘उतरन’ या मालिकेतून अभिनेत्री रश्मी देसाई अधिक नावारूपास आली. त्यानंतर तिने अनेक मालिकांमध्येही महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. याचप्रमाणे रश्मी ‘बिग बॉस’च्या १३ व्या सीजनमध्येही दिसून आली होती. या क्षेत्रामध्ये काम करताना तिला मोठ्या संघर्षाचा सामना करावा लागला होता. मालिकेत काम करत असताना तिने सहअभिनेत्याबरोबर लग्नदेखील केले होते. मात्र हे लग्न अधिक काळ टिकू शकले नाही. ‘उतरन’ या मालिकेतील तिच्या नवऱ्याची भूमिका साकारणारा नंदिश संधुबरोबर लग्नबंधनात अडकली होती. तिच्या लग्नानंतर ती मोठ्या प्रमाणात चर्चेत आली होती. (rashmi desai divorce)
मालिकाविश्वामध्ये अनेक जोड्या बनतात. काही जोड्या टिकतात तर काही टिकत नाहीत. असेच काहीसे रश्मीबरोबर झाले. मालिकेला खूप प्रेम मिळत असताना तसेच तिच्या भूमिकेलाही पसंती मिळत असताना रश्मीची नंदिशबरोबर चांगली मैत्री झाली. त्यांच्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले आणि नंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. मात्र लग्नाच्या चार वर्षातच त्यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला. त्यांनी घटस्फोट घेतल्यानंतर एकमेकांवर अनेक आरोपदेखील केले होते. मात्र नक्की कारण काय हे मात्र अद्याप समोर आले नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, लग्न मोडण्याचे खरे कारण हे नंदिशची अनेक मुलींरोबर असलेली मैत्री खटकत असल्याचे रश्मीने सांगितले होते. तसेच घरगुती हिंसाचाराचे आरोपही त्याच्यावर केले होते. त्याच प्रमाणे रश्मी ही अतिसंवेदनशील असल्याने तिच्याशी असलेले नाते संपवले असल्याचे नंदीशने सांगितलं होतं. त्याने रश्मीला नाते वाचवण्यासाठी विनंतीदेखील केली. मात्र रश्मीने जेव्हा दुसऱ्यांदा घटस्फोटाची मागणी केली तेव्हा मात्र नंदिशने घटस्फोट देण्याचा निर्णय घेतला. दोघांनीही त्यांचे नातं वाचवण्यासाठी डान्स शोमध्ये सहभाग घेतला होता. मात्र त्याचाही काही परिणाम झाला नाही.
रश्मी व नंदिशने २०१२ साली लग्न केले. लग्नाला चार वर्ष पूर्ण होण्याआधीच २०१६ साली दोघांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला. त्याचप्रमाणे रश्मी व नंदिश आता त्यांच्या नात्यावर कोणतेही भाष्य करणे पसंत करत नाहीत.