सध्या सिनेसृष्टीतून बऱ्याच वाईट बातम्या कानावर येत आहेत. अशातच आता एका प्रसिद्ध अभिनेत्याने पत्नीपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध मालिका ‘कुमकुम भाग्य’ या मालिकेतील अभिनेता अभिषेक मलिक व त्याची पत्नी सुहानी चौधरी यांच्या घटस्फोटाच्या चर्चा अनेक दिवसांपासून समोर येत होत्या. सदर वृत्ताला दोघांनीही दुजोरा दिला असून आम्ही एकमेकांच्या सहमतीने वेगळे होण्याचा निर्णय घेत असल्याचे स्पष्ट केले आहे. या बातमीने अभिषेक व सुहानीच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. (Actor Abhishek Malik Divorce)
नऊ महिने एकमेकांना डेट केल्यानंतर अभिषेक व सुहानी यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यांनतर २०२१ मध्ये दोघेही लग्नबंधनात अडकले. घटस्फोटाच्या चर्चेवर अभिषेक म्हणाला की, “आमच्या मनात कोणतीही चुकीची भावना नाही. आम्ही यापुढेही एकमेकांशी चांगले राहू”. तर सुहानी म्हणाली की, “आमच्यामध्ये काही मतभेद आहेत पण हे आम्ही जेव्हा एकत्र राहायला लागलो तेव्हा आम्हाला समजले. सध्या आम्हाला एकमेकांबद्दल कोणतीही तक्रार नाही. आम्ही दोघांनीही आपापल्या आयुष्यात पुढे जावे असे आम्हाला वाटत आहे. वेगळे होण्याचा निर्णय घेणे आमच्यासाठी कदाचित योग्य आहे. मी अभिषेकच्या उज्वल भविष्यासाठी प्रार्थना करते”, असे तिने स्पष्ट केले आहे.
अभिषेकला जेव्हा त्याच्या नात्याबद्दल सुरुवातीला विचारण्यात आले तेव्हा तो म्हणाला होता की, “जेव्हा मी सुहानीला पहिल्यांदा भेटलो तेव्हा आम्ही आमचे फोन नंबर एकमेकांना दिले. पण त्यावेळी याचा काय फायदा असेही वाटले होते. कारण मी मुंबईमध्ये होतो तर सुहानी दिल्लीमध्ये होती. पण २०२०ला कोरोना दरम्यान लॉकडाऊन झाल्याने मी दिल्लीला परतलो. त्यावेळी आम्ही आमचं नातं पुढं नेण्याचा विचार केला. पडद्यावर अनेकदा लग्न केली आहेत पण खऱ्या आयुष्यात आपल्या प्रिय व्यक्तीबरोबर लग्न करणं आणि त्याच व्यक्तीबरोबर घरी जाणं हे खूपच आनंद देणार आहे”, अशा शब्दात त्याने आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या.
अभिषेकने आपल्या करिअरची सुरुवात २०१२ साली ‘छल-शह और मात’ या मालिकेमधून केली होती. त्यानंतर तो ‘दिल की नजर से खूबसूरत’, पुनर्विवाह- एक नई उम्मीद’, ‘मुस्कुराने की वजह तुम हो’ या मालिकांमधून त्याने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं.