टोल दरवाढीचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. टोल दरवाढीवरुन मनसे पक्ष आक्रमक झाला आहे. इतकंच नव्हे तर महाराष्ट्रभर या मुद्द्याची चर्चा सुरु असताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे स्वतः याकडे लक्ष देत आहेत. टोल दरवाढीच्या लढाईमध्ये राज ठाकरे यांचा लढा सुरु असताना कलाकार मंडळीही याबाबत व्यक्त होताना दिसत आहेत. अभिनेत्री तेजस्विनी पंडितने टोल दरवाढीबाबत केलेलं ट्वीट सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. तिने ट्वीटद्वारे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा व्हिडीओ शेअर केला आहे. (Tejaswini pandit talk about devendra fadnavis)
तेजस्विनीने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये देवेंद्र फडणवीस टोलबाबत बोलताना दिसत आहेत. “शिवसेना-भाजपाची युती असताना आम्ही जी घोषणा केली होती त्यानुसार राज्यातील सगळ्या टोलवर चार चाकी गाड्या व छोट्या गाड्यांना टोल माफी दिली आहे. महाराष्ट्रामध्ये कमर्शियल मोठ्या गाड्यांकडून आम्ही फक्त टोल घेतो”. असं देवेंद्र फडणवीस त्या व्हिडीओमध्ये म्हणत आहे.
म्हणजेऽऽऽऽऽऽऽ ???????
— TEJASWWINI (@tejaswwini) October 8, 2023
ह्यांना कळतंय ना नेमकं हे काय बोलतायत ??
मग इतके वर्ष आम्ही जो टोल भरतो आहोत तो कुणाच्या खिशात जातोय ?
राजसाहेब तुम्हीच आता काय ते करा,
महाराष्ट्राला वाचवा ह्या टोल धाडीतून !!
How can this even be a statement from the “Hon Deputy Chief Minister”… pic.twitter.com/qsJmPSYrI6
हा व्हिडीओ शेअर करत असताना तेजस्विनीने दिलेलं कॅप्शन लक्ष वेधून घेत आहे. ती म्हणाली, “म्हणजे… यांना कळतंय ना नेमकं हे काय बोलत आहेत?. मग इतके वर्ष आम्ही टोल भरत आहोत तो कोणाच्या खिशामध्ये जात आहे. राजसाहेब तुम्हीच आता काय ते करा. या टोल धाडीमधून महाराष्ट्राला वाचवा. माननीय उपमुख्यमंत्री असं विधान कसं करू शकतात? तुमचीही फसवणूक झाली असेल तर शेअर करा ”.
तेजस्विनीने टोल दरवाढी व देवेंद्र फडणवीस यांच्या व्यक्तव्यानंतर संताप व्यक्त केला आहे. “टोल म्हणजे महाराष्ट्रामधील सगळ्यात मोठा घोटाळा आहे” असं म्हणत राज ठाकरेंनी राज्य सरकारवर टीका केली आहे. शिवाय टोलनाके बंद न केल्यास जाळून टाकण्याचा इशाराही त्यांनी दिला. आता हे प्रकरण कुठपर्यंत पोहोचणार?, तसेच टोलच्या नावाखाली सर्वसामान्यांची सुरु असलेली फसवणूक बंद होणार का? हे पाहावं लागेल.