मराठी सिनेसृष्टीतील ‘चॉकलेट बॉय’ म्हणजे अभिनेता स्वप्निल जोशी. स्वप्नीलने बालकलाकार म्हणून त्याच्या अभिनय कारकीर्दीला सुरुवात केली. त्यानंतर तो दूरदर्शनवरील ‘श्री कृष्णा’ या लोकप्रिय मालिकेत काम करताना दिसला. स्वप्नीलने अनेक चित्रपट व मालिका केल्या असून ओटीटी वेबसीरिजमध्ये त्यांनी आपलं नशीब आजमावलं आहे. स्वप्नीलने अनेक कलाकृतींमध्ये विविध भूमिका साकारत प्रेक्षकांचे मनोरंजन केलं आहे. अभिनयाबरोबरच स्वप्नील चित्रपट निर्मिती क्षेत्रात उतरला आहे. शिवाय, तो सोशल मीडियाद्वारे नेहमीच त्याच्या चाहत्यांच्या संपर्कात राहतो. (Swapnil Joshi talks about his 10th Results)
नुकतंच स्वप्नीलने ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’च्या मंचावर हजेरी लावली होती. ज्यात तो त्याच्या आईबरोबर आला होता. यावेळी स्वप्नीलला एक खास गोष्ट दाखवण्यात आली होती. ते म्हणजे त्याच्या दहावीच्या परीक्षेतील मार्क्स. स्वप्नीलला दहावीच्या परीक्षेत ७९.८५% इतके मार्क्स मिळाले होते. विशेष म्हणजे, तो अभिनय क्षेत्रात वावरूनही त्याला इतके मार्क्स मिळाले होते. याबद्दलची आठवण सांगताना स्वप्नीलने एका शूटिंग दरम्यानचा एक प्रसंग सांगितला.
झी मराठीच्या ऑफिशिअल सोशल मीडिया अकाऊंटवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे, ज्यामध्ये त्याने हा किस्सा सांगितला. मृण्मयीने स्वप्निलच्या दहावीचे मार्क्स दाखवले, त्यानंतर तिने अभिनय क्षेत्रात काम करूनही त्या काळात एवढे मार्क्स कसे मिळवले? असा प्रश्न स्वप्निलच्या आईला विचारला असता त्या म्हणाल्या, “खरंतर मी स्वप्नीलकडून विशेष असं काही करून घेतलं नव्हतं. तो त्याच्या वर्गातील मुलांबरोबर अभ्यास करायचा किंवा शाळेतून काही अभ्यास करून घेतलेलं असायचं. पण परमेश्वराची कृपा त्याच्यावर आहेच, त्याच्यामुळे तो एकपाठी आहे.”
हे देखील वाचा – दिवाळी पाडवा जवळ येताच अविनाश नारकरांचा नवरेमंडळींसाठी मोलाचा सल्ला, म्हणाले, “बायको कितीही रागवू द्या फक्त…”
पुढे स्वप्नील म्हणाला, “दहावीच्या परीक्षेपूर्वी मी पुण्यामध्ये साधू वासवानी यांच्या आयुष्यावर डॉक्युमेंटरी ड्रामा चित्रपटात काम करत होतो. त्यात मी दादांच्या लहानपणीची भूमिका करत होतो. आम्ही ते आधीच शूट केलं होतं, पण ते शूट रेकॉर्डिंगच्या कॅसेट्स ऐनवेळी जळाल्या. आमच्या चार दिवसाचं शूटिंग त्यात गेलं. तेव्हा त्या दिग्दर्शकाचा फोन मला आला की, हे शूटिंग आपल्याला मिशनमध्ये सबमिट करायचं असल्यामुळे आपल्याला चार दिवस शूटिंग करावं लागेल.”
हे देखील वाचा – Video : …अन् भाऊ कदमांना पाहताच आदित्य ठाकरेंनी मिळवला हात, गरबा कार्यक्रमाच्या ‘त्या’ व्हिडीओने वेधलं लक्ष
“हे सगळं घडलं तेव्हा मी लहान होतो. तेव्हा माझे नातेवाईक माझ्या घरी आले आणि माझ्या आई-वडिलांना खूप बोलले की, तुम्ही त्याच्या आयुष्याचं वाट्टोळं करतात. त्याला काय पैसेच कमवायला लावतात का?, वगैरे वगैरे. तेव्हा आई-वडिलांनी मला सांगितलं होतं की, ती माणसं खरंच अडकली आहेत आणि तुझ्या एकट्यामुळे त्यांचं नुकसान होईल. तर तू म्हणालास आपण हो सांगू त्यांना, नाही म्हणालास तर नाही सांगू. तेव्हा मी बाबांना म्हटलं होतं की, आपण शूटिंग करायला जाऊ या, असं बोललो. त्याच्यानंतर मी ती परीक्षा दिली आणि मला हे चांगले मार्क मिळाले. त्यामुळे हे मार्क्स माझ्यासाठी विशेष आहे. कारण तुम्ही कुठलीही चांगली गोष्ट चांगल्या हेतूने केली तर परमेश्वर तुमच्या मागे उभा राहतो.” असं म्हणत स्वप्नीलने सुरेश वाडकर यांच्याकडे ‘तू कितनी अच्छी हैं’ हे गाणं गाण्याची इच्छा व्यक्त केली. हा व्हिडीओ व्हायरल होताच नेटकऱ्यांनी अभिनेत्याचे कौतुक केले.