गणेशोत्सवानिमित्त सर्वत्र धमाल करतानाचे वातावरण आहे. गणरायाच्या स्वागतासाठी सगळेचजण तयारी करण्यात व्यस्त आहेत. आज गणरायाचं आगमन झालं असून त्याच्या नैवेद्यासाठी उकडीचे मोदक बनवण्यात आले आहेत. सगळ्यांच्या घरोघरी वेगवेगळ्या प्रकारचे उकडीचे मोदक बनवून बाप्पासाठी नैवेद्य दाखवला जातो. अशातच कलाकारांच्या घरी ही गणेशोत्सवाचं जोरदार आगमन झालं आहे. अनेक कलाकार मंडळींनी बाप्पाचं जोरदार स्वागत केलं आहे. अभिनेत्री स्वानंदी टिकेकरच्या घरी ही बाप्पाचं आगमन झालं आहे. (Swanandi Tikekar Making Modak)
स्वानंदीने लाडक्या बाप्पाच्या स्वागतासाठी खास उकडीचे मोदक बनवण्याचा प्रयत्न केला आहे. स्वानंदीने मोदक बनवतानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावरून शेअर केला आहे. मात्र मोदक बनवण्याचा तिचा प्रयत्न फसलेला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळाला. अनेक प्रयत्ना नंतरही स्वानंदीला काही मोदकाचा आकार जमला नाही. मोमोज सारखा मोदकाचा आकार झाल्याचं या व्हिडीओमध्ये दिसत आहे. स्वानंदीने या व्हिडीओला “मोदकचा झाला मोमो” असं कॅप्शन दिलं आहे.
स्वानंदीच्या या मोदक बनवतानाच्या मजेशीर व्हिडीओवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत. चाहत्यांनी केलेल्या कमेंटने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. स्वानंदीच्या या व्हिडिओवर अभिनेता यशोमनने कमेंट करत लिहिलं “वाह!!! ओ कुलकर्णी!!! मुलीला मोदक जमत नाहीत! आता बसा बोंबलत” अशी कमेंट केली असून यावर स्वानंदीच्या होणाऱ्या नवऱ्याने म्हणजेच आशिष कुलकर्णीने बायकोची बाजू सांभाळून घेत “काही हरकत नाही, मी घेतोय शिकून” असं म्हटलं आहे. तर एका चाहत्याने गमतीशीर कमेंट करत म्हटलं आहे की, “ठीक आहे ग, अगदी कचोरी नाही झाली ना, मग चालेल” असं म्हटलं आहे. तर आणखी एका युजरने, “खाणंच सोप आहे, जावू द्या करायच्या भानगडीत नका पडू” असं म्हटलं आहे.
काही दिवसांपूर्वी स्वानंदी व आशिषने ‘आमचं ठरलं’ असं म्हणत जाहीरपणे प्रेमाची कबुली दिली होती. त्यानंतर या दोघांनी थाटामाटात साखरपुडा सोहळा उरकला. या साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात वायरल झाले होते.