Suraj Chavan And Paddy Kamble : ‘बिग बॉस मराठी’ सीझन ५ हे पर्व विशेष चर्चेत असलेलं पाहायला मिळालं. यंदाच्या या पर्वात सर्वच स्पर्धकांनी धुमाकूळ घातलेला पाहायला मिळाला. या पर्वाच्या विजेतेपदाचा बहुमान रील स्टार सूरज चव्हाणने पटकावला. तर उपविजेतेपद अभिजीत सावंतला मिळालं. ‘बिग बॉस’च्या घरातून बाहेर आल्यानंतर सूरजच्या विजयाचं भरभरुन कौतुक होताना पाहायला मिळालं. ‘बिग बॉस’च्या घरात असताना सूरज चव्हाणचा प्रवास पाहणं रंजक ठरत होतं. यावेळी सूरजला सर्वच स्पर्धकांनी बरंच समजून घेतलं. त्याचं कौतुक केलं. मात्र या प्रवासात सूरजला एका खास स्पर्धकांचा विशेष पाठिंबा मिळाला ती व्यक्ती म्हणजे पंढरीनाथ कांबळी. ‘बिग बॉस’च्या घरात पॅडी कांबळे व सूरज चव्हाणचे खास नाते पाहायला मिळाले.
पंढरीनाथ यांनी ‘बिग बॉस’च्या घरात सूरज चव्हाणला खूप साथ दिली. त्यांनी स्वतःच्या मुलासारखं त्याला आधार दिला. बरेचदा ते शोमध्ये सांगताना सुद्धा दिसले की तुझ्या वया इतकीच माझी मुलगी आहे. त्यामुळे तू मला माझ्या मुलासारखा आहेस. मी बाहेर गेल्यावर सुद्धा तुला तशीच साथ देईल. महिन्यातून दोन ते तीन वेळा तरी तुला भेटेल. तुझं भविष्य घडवायला मी तुझ्यासोबत राहीन, असा शब्दही पॅडी यांनी दिलेला पाहायला मिळाला.
आणखी वाचा – खुशबू तावडेने पहिल्यांदाच शेअर केला लेकीचा सुंदर फोटो, नावही आहे खूप खास, पोस्ट पाहून कौतुकाचा वर्षाव
आता ‘बिग बॉस’च्या घराबाहेर आल्यानंतरही हे बाप-लेकाचं नातं पाहायला मिळालं. पॅडी कांबळे व सूरज चव्हाणचा एक सुंदर असा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतं आहे. या व्हिडीओमध्ये सूरज व पॅडी यांची भेट पाहायला मिळत आहे. ‘बिग बॉस मराठी’ मधून बाहेर पडल्यानंतर पहिल्यांदाच सूरज व पॅडी यांची भेट झाली आहे. ही भेट होताच त्यांनी एकमेकांना कडकडून मिठी मारलेली दिसली. त्यांचा हा व्हिडीओ त्यांनी इन्स्टाग्राम अकाउंटवरुन शेअर करताच नेटकऱ्यांनी या व्हिडीओला पसंती दर्शविली आहे.
‘बिग बॉस’च्या घरातून पॅडी बाहेर जाताना सूरज मिठी मारून खूप भावुक झालेला दिसला. शिवाय जाता जाता पॅडी यांनी त्यांच्या खात्यात असलेले म्युचल फंड्सचे कॉईन सुद्धा सूरजला दिले. पण याशिवाय ते एक वाक्य म्हणाले ज्यामुळे त्यांचे खूप कौतुक झाले. घरातून बाहेर पडत असताना पॅडी म्हणाले की, “मी माझ्या कॉइंसचा नॉमिनी सूरज चव्हाणला करतोय. तो सगळ्या गोष्टींना नॉमिनी असेल आणि फक्त इथेच नाही तर मी त्याचं पालकत्व आता आयुष्यभरासाठी घेतलंय”. पंढरीनाथ यांच्या या वाक्याचं खूप कौतुक झालं.