‘गदर एक प्रेमकथा’ चित्रपट प्रदर्शित होऊन २२ वर्षांचा काळ उलटून गेला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम दिलं. आता या चित्रपटाचा सीक्वेल प्रदर्शित झाला आहे. ‘गदर २’ चित्रपटाची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरु होती. चित्रपटाचं पोस्टर, टीझर, ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांना या चित्रपटाबाबत उत्सुकता निर्माण झाली होती. ‘गदर २’च्या प्रदर्शनानंतर चित्रपटगृहांबाहेर प्रेक्षक चित्रपट पाहण्यासाठी गर्दी करत आहेत.
चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच ‘गदर २’ने लाखो रुपयांची कमाई केली होती. प्रेक्षकांनी फर्स्ट डे फर्स्ट शो पाहण्यासाठी चित्रपटाच्या तिकिटांचं आगाऊ तिकीट बुक केलं. आता या चित्रपटाचं पहिल्या दिवसाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर आलं आहे. चित्रपटाने पहिल्याच दिवशी रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे.
‘गदर २’च्या निर्मात्यांनी चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनबाबत सांगितलं आहे. पहिल्याच दिवशी चित्रपटाने ४० कोटी १० लाख रुपयांची कमाई केली आहे. शाहरुख खानच्या ‘पठाण’नंतर ‘गदर २’ पहिल्या दिवशी सर्वाधिक कमाई करणारा दुसरा चित्रपट ठरला आहे. ‘पठाण’ची पहिल्या दिवशीची कमाई ५५ कोटी रुपये इतपत होती. सध्या या चित्रपटाचाच सगळीकडे बोलबाला आहे.
आणखी वाचा – Gadar 2 First Review : कसा आहे सनी देओलचा ‘गदर २’ चित्रपट, पहिला शो बघितल्यानंतर प्रेक्षक म्हणाले…
प्रेक्षकांना ‘गदर २’चा फर्स्ट हाफ खुर्चीमध्ये खिळवून ठेवणारा वाटला. तर त्यानंतरची कथा रट्याळ वाटली. तर काहींना हा चित्रपट अधिक आवडला असल्याची प्रतिक्रिया प्रेक्षकांनी दिली होती. या चित्रपटाचं दिग्दर्शन अनिल शर्मा यांनी केलं आहे. तर सनी देओल, अमीषा पटेल, उत्कर्ष शर्मा आदी कलाकार या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहेत. ‘गदर २’ रेकॉर्डब्रेक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीमध्ये समाविष्ट होणार का? हे पाहावं लागेल.