मुंबईत घर घेणं हे प्रत्येकाचंच एक स्वप्न असतं. मुंबई या स्वप्ननगरीत अनेक आपली स्वप्ने पूर्ण करायला येतात आणि त्यांची ही स्वप्नं पूर्ण करण्यासाठी ते जीवापाड मेहनतही घेतात, अशीच मेहनत घेऊन एका मराठी कलाकाराने आपलं मुंबईत स्वत:चं नवीन घर उभं केलं आहे. हा मराठी अभिनेता म्हणजे कपिल होनराव. स्टार प्रवाहवरील सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेतून त्याने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज गाजवलं. नुकताच या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला. मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला असला तरी मालिकेतील कपिलची भूमिका आजही अनेकांच्या लक्षात आहे. याच कपिलने मुंबईत त्याचं स्वत:च हक्काचं नवीन घर घेतलं आहे. (Kapil Honrao New Home)
कपिलने या नवीन घराबद्दलची सोशल मीडिया पोस्ट शेअर केली आहे आणि या पोस्टमधून त्याने आपल्या नवीन घराच्या भावनाही व्यक्त केल्या आहेत. या पोस्टमध्ये त्याने असं म्हटलं आहे की, “मुंबईत स्वतःच घर घेणं आणि ते ही अंधेरीसारख्या ठिकाणी. चार कपडे, एक छोटीशी बॅग आणि खिशात १,५०० रुपय घेऊन गावावरून अभिनयाचं स्वप्न घेऊन येणाऱ्या माझ्यासारख्या मुलासाठी खूप मोठी गोष्ट आहे. मुंबईत आलो तेव्हा भांडुपला १० बाय १०च्या खोलीमध्ये राहताना जीव गुदमरल्यासारखा व्हायचा. यार कुठे आलो आहोत आपण असं वाटायचं. फिल्ममध्ये जशी मुंबई पाहतो तशी नाही. कुठे राहत आहोत आपण? ऑडिशनसाठी अंधेरीला जायचो. तेव्हा मोठ्या मोठ्या इमारती पाहिल्या की वाटायचं यार ही खरी मुंबई”.
आणखी वाचा – “हफ्ते परवडत नाहीत म्हणून…”, गाडी विकल्यानंतर अंकिता वालावलकरला नेटकऱ्याने हिणवलं, म्हणाली, “बघत राहा की…”
यापुढे त्याने असं म्हटलं आहे की, “इथे घर असलं पाहिजे. ऑडिशन झालं की मित्रांबरोबर फिरताना उगाच बोलायचो इथे घर घेईन मी, तु तिथे घे. पण त्यावेळी ते फक्त दिवास्वप्नअसायचं. ही मुंबई तुम्हाला लगेच आपलंस नाही करत. खूप परीक्षा घेते. खूप वेळा ही मुंबई सोडून घरी परत जावस वाटायचं. पण माझ्याबरोबर कायम एक खंबीर मुलगी होती. अगदी सुरवातीपासून. आज या मुंबईत आणि इंडस्ट्रीमध्ये मी फक्त आणि फक्त तिच्या सोबतीमुळेच आहे आणि हे घरसुद्धा तिच्या सोबती शिवाय शक्यच झालं नसतं. पैसे आले की उधळपट्टी करणारा मी, पण एक एक रुपया जपून ठेवायची अक्कल तिने दिली”.
आणखी वाचा – ‘दहावी-अ’च्या ट्रेलरला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद, एका दिवसांतच एक लाखांपेक्षा अधिक व्ह्युज, उत्सुकता शिगेला
यापुढे त्याने असं म्हटलं की, “रेणू आज मला खूप आनंद होत आहे की, तुला मी हे घर गिफ्ट म्हणून देत आहे. हे माझं नाही तर तुझं घर आहे आणि या फाटक्या मुलाचा हात ज्या विश्वासाने तू धरलास, आई-वडिलांच्या विरोधात जाऊन तू माझ्याशी लग्न केलंस. त्याच मुलाने लग्नानंतर पाच वर्षात, इतक्या कमी वयात करोडोचं घर घेतलं आहे. तू नेहमी बोलतेस ‘आप खुद पे विश्वास करो आप कर लोगे’. आज मला खूप आनंद होत आहे की, तुझा विश्वास मी सार्थ ठरवला. मी तुझ्यावर प्रेम खूप करतो. अशीच कायम माझ्याबरोबर राहा”. दरम्यान, कपिलने शेअर केलेल्या या व्हिडीओखाली अनेकांनी त्याला अभिनंदं असं म्हटलं आहे. तसंच त्याला नवीन घरानिमित्त शुभेच्छाही दिल्या आहेत