‘बिग बॉस मराठी ५’ मधून घराघरांत पोहोचलेली सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर म्हणजे अंकिता वालावलकर. सोशल मीडियावर ती ‘कोकण हार्टेड गर्ल’ म्हणून लोकप्रिय आहे. काही दिवसांपूर्वी तिने सोशल मीडियावर तिची कार विकल्याचे फोटो शेअर केले होते. यावेळी अंकिता भावुक झाल्याचेही पाहायला मिळाले. अशातच आता अंकिताने नुकतीच एक पोस्ट शेअर केली आहे आणि याबद्दल तिने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. अंकिताने गाडीबरोबरचे काही खास क्षण शेअर केले आहेत आणि तिच्या गाडीला निरोप देतानाचे दु:खी क्षण शेअर केले आहेत. (Ankita Walawalkar trolled)
याबद्दल तिने असं म्हटलं आहे की, “माझी पहिली कार. मला जाणीव होती की, ती फक्त भावनेसाठी ठेवणे आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरणार नाही आणि मला आशा आहे की, ती अजूनही दुसऱ्याला आनंदी करू शकेल. म्हणून जेव्हा कोणीतरी कारसाठी आले तेव्हा तो क्षण माझ्यासाठी खरोखर कडू व गोड क्षण होता. त्यामुळे तेव्हा अश्रू रोखणे मला कठीण होते. भावनात्मक मूल्य हेच मला मारून टाकते. तुम्ही त्या आठवणींना कधीही विश्रांती देऊ शकत नाही, तुम्ही त्या दूर केल्यावर तुम्हाला कसे वाटले ते तुम्ही विसरू शकत नाही. ते वाहन तुम्ही, तुमच्या कुटुंब आणि मित्रांबरोबर फिरत असलेल्या प्रत्येक गोष्टीशी कसे संबंधित होते हेही तुम्ही विसरू शकत नाही”.
यापुढे तिने असं म्हटलं आहे की, “माझ्यासाठी वाहन हे स्वातंत्र्याचे प्रतिनिधित्व करते आणि तुम्ही किती दूर जाल आणि गेला आहात याचेही. जेव्हा तुम्ही या सर्व आठवणी विकून टाकाल तेव्हा नक्कीच त्याचा जोरदार फटका तुम्हाला बसेल. तेव्हा तुम्ही ते स्वप्न आणि दृष्टी सोडली की नाही याबद्दल तुम्हाला शंका वाटू लागते. पण तुम्ही पुढे जाल आणि शिकाल. जर मी ते पुन्हा सुरुवातीपासून करू शकले तर मी तेच करेन. मी ते स्वप्न जगले, पण आर्थिकदृष्ट्या ते धरून राहण्यात अर्थ नाही”.
यापुढे अंकिताने असं म्हटलं की, “माझ्या कारला गुडबाय म्हणताना गहिवरुन येत आहे. पण ती भंगारात जाण्यापेक्षा नवीन घरी जाईल हे कळल्यावर आनंद झाला. मला सुरक्षित ठेवल्याबद्दल आणि आठवणींसाठी धन्यवाद. तुझा निरोप घेणे भावनिकदृष्ट्या कठीण आहे”. अंकिताच्या या पोस्टला अनेकांनी लाईक्स व कमेंट्स करत प्रतिसाद दिला आहे. या पोस्टखाली कुणी तिच्या गाडीबद्दल भावुक प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. तर कुणी तिला या गाडी विकण्याबद्दल ट्रोल केलं आहे. या पोस्टखाली एकाने अंकिताला “सोप्या भाषेत आता हफ्ते परवडत नाहीत” असं म्हटलं आहे.
नेटकऱ्याच्या या कमेंटवर अंकितानेही “stay tuned” असं उत्तर दिलं आहे. तसंच आणखी एकाने पाहुण्यांनी पायाचा चिखल लागेल म्हणून गाडीत बसून दिलं नव्हत. नंतर तू स्वतःच्या हिमतीने गाडी घेऊन दाखवली” अशी कमेंट केली आहे. तर एकाने “पहिली गाडी हे इमोशन असते पैसा आज आहे उद्या नाही पैसा येत जात राहतो, परंतु पहिली गाडी ही पहिली असते ती विकायची नसते जपायची असते. असं माझं तरी मत आहे” असं म्हटलं आहे. तर अनेकांनी तिला नवीन गाडी घेण्याचेही सल्ले दिले आहेत.