‘इट्स मज्जा’ने आपल्या प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी काही दिवसांपूर्वी ‘आठवी-अ’ ही सीरिज भेटीला आणली होती. या सीरिजला प्रेक्षकांकडून तुफान प्रतिसाद मिळाला होता. डोंगरावरच्या एका छोट्याश्या खेडेगावातून हायस्कुलसाठी परगावी येणाऱ्या आभ्या व त्यांच्या खास मित्रांची साधी तरी प्रत्येकाला आपलीशी व हवीहवीशी वाटणारी गोष्ट प्रेक्षकांनाही तितकीच भावली होती. पण २५ भागांनंतर या सीरिजने प्रेक्षकांचा निरोप घेतला. ‘आठवी-अ’ ही सीरिज संपल्यामुळे चाहत्यांमध्ये नाराजीचा सुर पाहायला मिळाला. अनेकांनी ‘आठवी-अ’ ही सीरिज संपल्यामुळे नाराजी व्यक्त केली होती. मात्र ‘आठवी-अ’ या सीरिजच्या निरोपाबरोबरच ‘इट्स मज्जा’ने ‘दहावी-अ’ या सीरिजची घोषणा केली होती. (Dahavi-A Series Trailer)
त्यामुळे अनेकांना ‘दहावी-अ’ची उत्सुकता लागून राहिली होती. अनेकजण या सीरिजची आतुरतेने वाट बघत होते आणि प्रेक्षकांची ही उत्सुकता नुकतीच संपली. २६ डिसेंबर रोजी शाहू कला मंदिर, सातारा येथे ‘दहावी-अ’चा भव्य ट्रेलर लाँच सोहळा पार पडला. ‘इट्स मज्जा’चे शौरीन दत्ता, अंकिता लोखंडे, सीरिज दिग्दर्शक व मुख्य कलाकारांच्या उपस्थितीत हा खास सोहळा पार पडला. समस्त सातारकर आणि आजूबाजूच्या गावातील प्रेक्षकांनी या भव्य ट्रेलर लाँच सोहळ्याला हजेरी लावली होती. ‘दहावी-अ’साठी प्रसिद्ध फुड ब्रँड ‘पालेकर’ व ‘द परफ्युम हाऊस’ यांचे सहकार्य लाभले आहे.
‘दहावी-अ’ मध्येही ‘आठवी-अ’मधील अथर्व अधाटे, सृष्टी दणाने, ओम पाणस्कर, श्रेयश कटके, सत्यजित होमकर, रुद्र इनामदार व संयोगिता चौधरी हे कलाकार आहेत. तसंच इतर कलाकारांनीही महत्त्वपूर्ण भूमिका साकारली आहे. या सगळ्या कलाकारांनी ट्रेलर लाँच सोहळ्याला हजेरी लावली होती. ‘दहावी-अ’चा हा ट्रेलर लाँच होताच अवघ्या काही क्षणांत लाखों व्ह्यूज आणि लाईक्स मिळाले आहेत. “ट्रेलर खूप छान आहे”, “खूप आवडला ‘दहावी-अ’चा ट्रेलर”, “अखेर आमची आतुरता संपली” अशा अनेक कमेंट्स करत नेटकऱ्यांनी या ट्रेलरला प्रतिसाद दिला आहे.
आणखी वाचा – “हफ्ते परवडत नाहीत म्हणून…”, गाडी विकल्यानंतर अंकिता वालावलकरला नेटकऱ्याने हिणवलं, म्हणाली, “बघत राहा की…”
त्याचबरोबर अनेक प्रेक्षकांनी या सीरिजच्या पहिल्या भागासाठी उत्सुकताही व्यक्त केली आहे. दरम्यान, शाळेचं दहावीचे वर्ष हे कायमच सर्वांसाठी खास असते. शाळेत घालवलेल्या प्रत्येक खास व संस्मरणीय आठवणींची शिदोरी घेऊन प्रत्येकजण आपल्या नव्या आयुष्याला सुरुवात करतो. याच आठवणींचं भावविश्व उलगडून दाखवणारी ‘मीडिया वन सोल्युशन्स’ प्रस्तुत, ‘कोरी पाटी’ प्रॉडक्शन व ‘इट्स मज्जा’ची ओरिजिनल सीरिज ‘दहावी-अ’ येत्या ६ जानेवारी पासून सोमवारी व गुरुवारी दुपारी १.३० वाजता ‘इट्स मज्जा’च्या युट्यूब चॅनेलवर प्रेक्षकांना पाहता येणार आहे